Twitter : @maharashtracity

मुंबई

एसटी कर्मचारी संघटनेने सोमवारपासून मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची तात्काळ दखल घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महागाई भत्यासह इतर मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. यामुळे एसटी कर्मचारी संघटनेने उपोषण मागे घेतले. यातून १३ सप्टेंबर रोजी कर्मचारी राज्यव्यापी बेमुदत उपोषण करणार होते. ते ही स्थगित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उदय सामंत यांनी भेट घेऊन चर्चा केली. सामंत यांच्या शासकीय निवासस्थानी सोमवारी रात्री संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक आयोजित करण्यात आली होती. दीर्घकाळ चर्चा झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यावर यशस्वी तोडगा काढण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सोमवारी रात्री उशीरापर्यंत चाललेल्या बैठकीत सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद दिला असून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे बेमुदत उपोषण स्थगित करण्यात आल्याचे महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांना सप्टेंबरच्या वेतनात ३४ टक्क्यांऐवजी ४२ टक्के महागाई भत्ता दिला जाणार आहे. तर सर्व थकबाकी संदर्भात १५ दिवसात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, उद्योग मंत्री व एसटी कामगार संघटनेसमवेत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. सण-उत्सवाची अग्रीम रक्कम १० हजारांवरून १२,५०० करण्यात आली. यात मूळ वेतनाची अट न घालता रक्कम देण्यात येणार आहे. एसटी कामगारांना १० वर्षांसाठी सातवा वेतन आयोग देण्यात येईल. वेतनवाढीतील थकबाकी देण्यात येईल. एसटी कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीनुसार मूळ वेतनात नोव्हेंबर २०२१ पासून अनुक्रमे ५ हजार रुपये, ४ हजार रुपये व २,५०० रुपये वाढ करण्यात येणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सामंत यांनी एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढ मागण्यांची दखल घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here