गर्भपात औषधांच्या ऑनलाईन विक्रीवर एफडीएची कारवाई

@maharashtracity

मुंबई: गर्भपातासाठी वापरात येणाऱ्या औषधाच्या विक्रीसाठी (मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेगन्सी किट) ऑनलाईन होकार दर्शविणे तसेच डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय विक्री करणे हे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० तरतुदींचे उल्लंघन असल्याने एफडीएने ऍमेझॉन (Amazon) व संबंधित वितरकाना नोटीस बजावली. यात एकूण ३४ ऑनलाईन संकेतस्थळावर गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांच्या उपलब्धतेबाबत पडताळणी केली.

या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून (FDA) महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने तपासणीसाठी विशेष मोहिम राबविली. ऍमेझॉन या संकेतस्थळावर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी ग्राहक म्हणून मागणी केली. त्यानुसार डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय गर्भपाताच्या औषधाची मागणी दोन वेळा ऍमेझॉनवर स्विकारून त्याची गुरुनानक इंटरप्राइजेस, लखनऊ, उत्तर प्रदेश व चौधरी फार्मास्युटिकल्स /पिरामल लि., कोरापूर, ओरिसा या संस्थेकडून औषधे पुरवण्यात आली.

तर दुसऱ्या प्रकरणात फ्लिपकार्ट या ऑनलाईन संकेतस्थळावर गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधाची मागणी करून डॉक्टरांच्या चिट्ठीची मागणी न करता औषधाची मागणी पुरवण्यात येणार असल्याचे एसएमएस संदेशद्वारे कळवण्यात आले. हे कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणारे असल्याने फ्लिपकार्ट (Flipkart) या कंपनीस नोटीस बजावण्यात आली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

नुकतेच पुणे येथे ऍमेझॉन या संकेतस्थळावरुन एमटीपी किटची (MTP Kit) विक्री पुण्यातील औषध विक्रेत्यास केल्याने औषध विक्रेत्याने पुणे येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयास तक्रार दाखल केली होती. या तक्रारी अनुषंगाने प्रशासनाने तातडीने कारवाई करुन यामध्ये सामील असलेला पुरवठादार, मे. आर. के. मेडिकल, अहमदाबाद, गुजरात (Ahmedabad, Gujarat) यांचेकडे प्रत्यक्ष जावून चौकशी केली. या वितरकाकडे औषधाचे खरेदी बिल नसल्याचे उडकीस आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून संबंधिताविरुध्द पुणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here