Twitter : @maharashtracity
मुंबई :
भुसावळ येथील रहिवासी आणि वासुदेव नेत्रालयाचे संचालक डॉ. नि. तु. पाटील यांनी १०८ दिवसात माँ नर्मदा परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण केली. त्याबद्दल महाराष्ट्र आप्थॉल्मॉलॉजिकल सोसायटी तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनकडून प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. डॉ. पाटील परिक्रमेवरुन परतल्यावर वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सवाद्य मिरवणूक काढून परिक्रममावासी डॉ. पाटील यांचे स्वागत करण्यात आले.
डॉ. नितु पाटील हे भुसावळ विभागातील चालत माँ नर्मदा परिक्रमा करणारे प्रथम तरुण डॉक्टर असून त्यांचे मूळगाव तळवेल आहे. ते त्यांच्या गावतीलही पायी परिक्रमा करणारे पहिले व्यक्ती आहेत. २२ जुलैला त्यांना १०८ दिवस पूर्ण झाले. २३ जुलैला त्यांनी अधिकृत पूजा करून ओंकारेश्वर आणि ममलेश्वरी या ठिकाणी जल चढवून परिक्रमा पूर्ण केली. माँ नर्मदा परिक्रमे वर बोलताना डॉ. पाटील यांनी अनुभव कथन केले. सहा एप्रिल हनुमान जन्मोत्सव या दिवशी डॉ. पाटील यांनी संकल्प करीत ओंकारेश्वर येथून माँ नर्मदा परिक्रमा उचलली. तिथून चालत चालत ते विमलेश्वर, गुजरातला गेले. त्या ठिकाणी समुद्र पार करून मिठी तलाई ते नेमावर, मग पुढे माँ नर्मदा उगमस्थान अमरकंटक आणि मग तिथून परत ओंकारेश्वर असा संपूर्ण तीन हजार सहाशे किलोमीटरचा प्रवास चालत चालत १०८ दिवसांत पूर्ण केला. या प्रवासामध्ये वेगवेगळे अनुभव आणि अनुभूती आले. या परिक्रमामध्ये त्यांनी मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि छत्तीसगढची सीमा या चार राज्यांचा प्रवास केला. विविध आश्रमांना, संतांना भेटी देत त्यांच्या आशीर्वाद घेतले. त्याबद्दल सगळे विविध अनुभव त्यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुकवर दिवस नुसार सर्वांसाठी लिहून ठेवले आहेत.
जगाच्या कल्याणासाठी परिक्रमा समर्पित…!
’प्रापंचिक जीवन जगत असताना अध्यात्मिक अनुभूती घेणे ही एक फार मोठी साधना आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील माँ नर्मदा परिक्रमा ही एक खडतर तपश्चर्या आहे. माँ नर्मदा मातेच्या कृपेने १०८ दिवसात परिक्रमा पूर्ण झाली असून ही परिक्रमा मी जगाच्या कल्याणासाठी माँ नर्मदा मातेच्या चरणी समर्पित करीत आहे.‘
– डॉ. नि.तु.पाटील, नेत्रतज्ज्ञ.