Twitter : @maharashtracity
मुंबई :
गुरुवारी मुंबईत साजऱ्या झालेल्या कृष्णजन्माष्टमी निमित्त रचलेल्या मानवी मनोऱ्यातील जखमी गोविंदाची संख्या वाढली आहे. विविध रुग्णालयांतील माहितीप्रमाणे आता पर्यंत १९५ गोविंदा जखमी झाल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली. सर्वाधिक जखमी गोविंदा पालिकेच्या केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एकूण ११ जखमी गोविंदा केईएममध्ये दाखल असून अनेकांच्या हाता-पायांना लागले आहे. काहींना मुका मार लागल्याचे सांगितले गेले असून काहींना छोट्या शस्त्रक्रियेची गरज असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. एकूण ५९ गोविंदा किरकोळ खरचटण्यासाठी किंवा जखमांसाठी दाखल झाले होते. त्यापैकी ४७ जखमी गोविंदाना डिस्चार्ज देण्यात आला. पालिका रुग्णालयांमध्ये एकूण १६५ आणि सरकारी रुग्णालयांमध्ये ३० जखमी गोंविदांची नोंद झाली.
सध्या केईएम रुग्णालयात ११, राजावाडी रुग्णालयात २, वीर सावरकर रुग्णालयात १, बीडीबीए कांदिवली रुग्णालयात १, वांद्रे भाभा रुग्णालय २ अशा एकूण १८ जखमी गोविंदांवर उपचार सुरु आहेत. केईएममध्ये असणाऱ्या ११ पैकी दोघांना मणक्याचे फ्रॅक्चर झाले आहेत. ८ ऑर्थोपेडिकमध्ये दाखल असून तीघे जनरल सर्जरी विभागात दाखल झाले आहे. ८ पैकी तिघांच्या शस्त्रक्रिया रात्रीच केल्या गेल्या. तसेच, दोन हिप फ्रॅक्चर आणि एकाला पायाचे फ्रॅक्चर आहे. तर, दोघांच्या मणक्याची शस्त्रक्रिया शनिवारी केली जाणार आहे.
एकाची प्रकृती गंभीर :
२५ वर्षीय सूरज कदम या मुलाच्या मानेला जबरदस्त मार बसला असून त्याच्या हाता-पायाची ताकद गेली आहे. सध्या याची प्रकृती गंभीर असून सध्या त्याच्यावर एचडीयू म्हणजेच हाय डिपेन्डंसी यूनिटमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती केईएम रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १९५ पैकी १७७ जखमी गोविंदाना संबंधित रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा जखमी गोविंदांची संख्या कमी झाली आहे. गेल्या वर्षी २२२ गोविंदा जखमी झाले होते आणि प्रथमेश सावंत या गोविंदाचा मृत्यू झाला होता.