Twitter : @maharashtracity
मुंबई
मुंबईतील यंदाचा दहिहंडी उत्सव विशेष ठरला असून यंदाच्या उत्सवाला निवडणूकीचा माहौल असल्याने राजकीय चुरस दिसून आली. सकाळपासून गोविंदा आला रे आला, गोविंदा रे गोपाळा, शोर मच गया शोर, मच गया शोर सारी नगरी रे… साराख्या दहिहंडी बाजाची गाणी सुरु झाली असली तरी रात्री बारा वाजल्यापासूनच गोविंदा पथकांमध्ये जल्लोष संचारला होता. ढाक्कुमाकुमच्या तालावर अवघी मुंबई दिवसभर नाचत होती. त्यात सकाळपासून पावसाने सुरुवात केल्याने गोविंदांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते.
दहिहंड्यामध्ये राजकीय माहौलाचा जोश :
राज्यातील राजकीय माहौल निवडणूकांचे असल्याने राजकीय चुरसी वातावरण प्रत्येक गोविंदा पथकांमध्ये दिसून आले होते. बुधवारी रात्री उशिरा बारा वाजेपर्यंत विभागातील गोविंदा पथकांच्या सराव मैदानात काही आमदारांची उपस्थिती उशिरापर्यंत असल्याचे गोविंदाकडून सांगण्यात आले. दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने राजकीय पक्षांनी आपापल्या मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु केल्याचे वातावरण होते. यंदाच्या दहीहंडी उत्सवात मुंबईतील सुमारे ७०० पथके सज्ज होती. प्रमुख राजकीय पक्षांमध्ये गट निर्माण झाल्याने ही संख्या वाढली असल्याचे सांगण्यात येत आहे. राजकीय पक्ष गोविंदा पथकांची माहिती घेऊन आर्थिक मदत देऊ करत होते. त्यामुळे राजकीय चुरसीच्या माहोलामुळे यंदा गोविंदा पथकांची चांगली कमाई होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत होतो.
अनेक मंडळांनी सहा थरांसाठी ७ हजार रुपये, सात थरांना १५ हजार रुपये, तर आठ थरांसाठी २५ ते ५० हजार रुपयंची बक्षिसे ठेवली होती. तर नऊ आणि दहा थर लावणाऱ्या मंडळांना लाखाच्या घारात रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली होती. यात राजकीय गटांकडून गोविंदा पथकाच्या प्रोत्साहनासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विक्रोळी मतदार संघातील आमदार सुनिल राऊत यांच्या हस्ते आई गांवदेवी गोविंदा पथकाच्या मंडळाच्या दहीहंडी जर्सीचे अनावरण करण्यात आले. यावेळी शाखाप्रमुख सचिन मदने, विधानसभा संघटक निलेश साळुंखे तसेच आई गांवदेही गोविंदा पथकातील गोविंदा तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
पर्यावरण पुरक दहिहंडीचा बोलबाला :
दादर येथील आयडियल तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आयोजित पर्यावरण पुरक दहीहंडी केंद्रस्थानी होती. या ठिकाणी ५ थर लावत दोन महिला गोविंदा पथकांनी दहीहंडीला पहिली सलामी दिली. कलर्स मराठीवरील कलाकार आणि दिल दोस्ती पागलपण या आगामी चित्रपटातील कलाकारांची उपस्थिती या ठिकाणी होती. तीर्थ मुरबाडकर या सिने अभिनेत्रीने यंदाची सेलिब्रिटी दहीहंडी फोडली. येथील पुरूषांच्या दहिहंडीचे यंदाचे ४९ वर्ष असून महिला दहिहंडीचे ३० वर्ष व सेलिब्रेटी दहीहंडी १७ वर्ष पूर्ण होत आहे. त्याचप्रमाणे मंडळाने विकलांग, अंधव्यक्तींसाठी सुद्धा उभारल्या दहिहंडी उभारल्या होत्या. दुपारी ३ पर्यंत २२ गोविंदा पथकांनी सलामीची सहभाग नोंदविला. कलासंजीवन आणि नयन फाऊंडेशन, अंधेरी या अंधेरीतील दिव्यांग पथकाने सगळ्यांचे लक्ष वेधले. दरवर्षी आम्ही ध्वनिप्रदूषण विरहित दहीहंडी हा उपक्रम राबवितो. सर्वत्र डॉल्बी आणि मोठे साउंड लावले जातात. मोठ्या उत्सवातून प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे यांनी दिली.
दहीहंडी उत्सवामुळे रस्ते बंद :
मुंबईतील रस्त्यांवर वाहतूक वळविण्यात आली होती. तर काही ठिकाणी बाईकस्वारांची गर्दी झाल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे शहरांसह उपनगरातील वाहतुकीचा वेग मंदावला हेता. दरम्यान दहीहंडी उत्सवामुळे भांडुप स्थानक पश्चिम ते टेंभीपाडा दरम्यान धावणारी ६०५ ही बस नरदास नगर येथे रात्री १ वाजल्यापासून खंडित करण्यात आली. वांद्रे पश्चिम येथील शांताराम हरी केळकर चौकात दहीहंडी कार्यक्रम असल्याने बसमार्ग क्रमांक ८० म , ए ३७५,४७३,सी ५०५ अप दिशेत वांद्रा टॉकीज मोती महल भाभा रुग्णालय मार्गे ७ वाजल्यापासून दिवसभरासाठी मार्ग बदलले होते.
काळाचौकी येथील रामभाऊ भोगले मार्गावर दहीहंडी निमित्त म्हाडा कॉलनी येथे स्टेज बांधल्यामुळे बसमार्ग ६४ च्या बस गाड्या सकाळी १० पासून काळा चौकीपर्यंत खंडित करण्यात आलेल्या होत्या. चुनाभट्टी फाटक येथे दहीहंडी असल्याने बस मार्ग क्रमांक ए ५ , ए ८५ व ३५५ म. दोन्ही दिशेत सकाळी ११ वाजल्यापासून चुनाभट्टी ऐवजी वसंतराव नाईक मार्गाने वळविले होते. दहिहंडा उत्सव साजरा होत असल्याने पी. एल.लोखंडे मार्ग, चेंबूर हा वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे अप आणि डाऊन दिशेमध्ये बस मार्ग बदलले होते. क्रमांक ए ३७७, ए ३७९ व ए ३७७ हे सकाळी ११ वाजल्यापासून जिजामाता भोसले मार्गावरून प्रवर्तित करण्यात आले होते.
दहीहंडीमुळे भांडुप स्थानक पश्चिम ते नरदास नगर दरम्यान चालणारे बस मार्ग खंडित केले होते. तर जुहू येथील हरे राम हरे कृष्ण मंदिर येथे भाविकांची गर्दी झाल्याने वाहतूक पोलिसांनी संत ज्ञानेश्वर मार्ग, मुक्तेश्वर देवालय मार्ग तसेच देवळे मार्ग वाहतुकीसाठी अप व डाऊन दिशेत बंद केल्याने बस मार्ग दुसरीकडे वळविला होता. प्रभादेवी, शिवाजीनगर मार्गही वळविले होते. वरळी गाव कोस्टल रोड येथे दहीहंडी उभारल्याने बसमार्ग दुसऱ्या मार्गाने वळविले होते.
मुंबईत दहीहंडी उत्सवासाठी चोख बंदोबस्त :
मुंबईत दहीहंडी उत्सव पोलिसांच्या चोख बंदोबस्तात पार पडला. उत्सवाच्या निमित्ताने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबईत कानाकोपऱ्यात पोलिस तैनात करण्यात आले होते. मुंबई पोलिसांसह राज्य राखीव दलाच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथक साध्या वेशात गर्दीत फिरत होती. या सोबतच वाहतूक पोलिसांकडून मुंबईच्या महत्वाच्या रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली होती. मुंबईत ४० हजराहून अधिक पोलिस शहराच्या विविध ठिकाणी तैनात केले गेले. मुंबई पोलिसांच्या अतिरिक्त आयुक्तांसह, विविध झोनचे उपायुक्त, राज्य राखीव पोलिस दलाच्या अतिरिक्त तुकड्या सह होमगार्ड्सचे जवान बंदोबस्तासाठी सहभागी झाले होते. पोलिसांनी महिलांची छेडछाड विरोधी पथक तैनात करण्यात आले होते. तर दहीहंडी उत्सवात शहरातील सुमारे ५ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले.