Twitter : @maharashtracity

मुंबई

दहिहंडी उत्सवाच्या मुहुर्तावर पावसाने मुंबईत गुरुवारी सकाळपासून रिपरिप सुरु केली. यामुळे दहिहंडी फोडण्यासाठी बाहेर पडलेल्या गोविंदांना पावसाची साथ मिळाली. त्यामुळे मुंबईतील वातावरण प्रसन्न झाले. आगामी दोन दिवस पावसाची साथ राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने केला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघरसह रायगड, रत्नागिरी, तसेच सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही आगामी दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

मुंबई वेधशाळेकडून दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार उपनगरात ५५.८ मिमी अशी नोंद सांगण्यात आली. उपनगरात गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली होती. मुंबईत सायंकाळी चार वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार शहरात ४२.२५, पूर्व उपनगर ४७.२२ तर पश्चिम उपनगरात ५६.३७ मिमी एवढ्या पाववसाची नोंद झाल्याचे मनपाच्या स्वयंचलित केंद्राकडून सांगण्यात आले. सायंकाळी ५.३० पर्यंत कुलाबा येथे ४३.६ तर उपनगरात ९२.५ अशी नोंद झाल्याचे सांगण्यात आले. तर शहरात ५७.६३, पूर्व उपनगरात ७६.९४ तर पश्चिम उपनगरात ९०.५० मिमी अशी नोंद झाली आहे.

रावळी कँप ९०, वडाळा ८३ दादर ८२, माटुंगा ८१, प्रभादेवी ७१२, हाजी अली ६७, गिरगाव ६२, परळ ६१, भायखळा ५९, वरळी ५७, गोवंडी १५०, विक्रोळी ९६, कुर्ला ८४, चेंबुर ८१, भांडूप ८०, कुर्ला ७६, गवाणपाडा ६०, मुलुंड ५९, घाटकोपर २९, मालवणी ११७, मरोळी ११५, अंधेरी प. १०४, चिंचाळी १०३, अंधेरी पूर्व १०१, गोरेगाव ९८, वांद्रे ९३, विलेपार्ले ९३, सांताक्रुझ ९२, बोरिवली ८९ मिमी असा पाऊस झाला. दरम्यान शहर आणि उपनगरात झाड पडण्याच्या ११ तर शॉर्टसर्किटच्या ८ घटना घडल्या.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, रायगड, जळगाव, धुळे, हिंगोली, लातूर, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. शनिवारपर्यंत राज्यातल्या कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये येलो अलर्ट असणार आहे. यावेळी सर्वच भागात मुसळधार पाऊस पडेल तर ७ सप्टेंबरला विदर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आगामी काही तासांमध्ये पालघर, नाशिक, परभणी, जालना, उस्मानाबाद, रत्नागिरी आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्य पावसाची शक्यता वर्तवली होती. तसेच आगामी काही तासांत १३ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात अनेक भागांमध्ये पावसाचा जोर असल्याचे दिसून येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here