संशयित मारेकरी गृहमंत्री अनिल देशमुखांचा खास कार्यकर्ता
मुंबई: घटनाकार डॉ बाबासाहेब आंबडेकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे नातू प्रकाश आंबडेकर (Prakash Ambedkar) यांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi – VBA) नागपूर (Nagpur) जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील पिंपळधरा येथील अरविंद बनसोड या दलित (Dalit) कार्यकर्यांच्या संशयास्पद मृत्यूचे राज्यातील आंबेडकरी जनता आणि दलित पँथरमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्याला वाचविण्यासाठी पोलिसांनी जाणीवपूर्वक बनसोडे मृत्यूची नोंद आत्महत्या अशी केल्याचा आरोप ऍड प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तर दलित पँथर सेनेने (Dalit Panthers Sena) एल्गार (Elgar) पुकारला असून गृहमंत्री (Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सह आरोपी करण्यात यावे आणि देशमुख यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
अरविंद बनसोड याची आत्महत्या नसून हत्या आहे, असा थेट आरोप ऑल इंडिया दलित पंथर्स सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी केला आहे. यासंदर्भात घटनाक्रम देऊन केदार यांनी पोलिसांचे वर्तन, बनसोड याचा जवाब घेण्यात केलेली दिरंगाई आणि रुग्णालयात अपयशी झुंज दिल्यानंतर मृत्यू पावलेल्या बनसोडच्या मृत्यूची नोंद करताना अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याच्या (Atrocities Act) कलमाचा उल्लेख टाळणे, यातून पोलीस या प्रकारणातील आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केला आहे.
केदार, ऍड आंबेडकर आणि सुनील खोब्रागडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बनसोड आणि त्याचा मित्र गजानन राऊत हे दि २७ मे रोजी एटीएममध्ये (ATM) पैसे काढायला गेले होते. एटीएमला लागून एच पी कंपनीची गॅस एजन्सी (HP Gas Agency) आहे. एजन्सीचा फोन नंबर घेण्यासाठी बनसोड याने एजन्सीच्या बोर्डाचा मोबाईलवर फोटो काढला.
खोब्रागडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गॅस एजन्सी मिथिलेश उमरकर याची आहे. उमरकर याचे वडील बंडोपंत उमरकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. तर संशयित मिथिलेश हा गृहमंत्री देशमुख यांच्या मतदारसंघातील पंचायत समिती सदस्य आहेत.
केदार आणि खोब्रागडे यांनी केलेल्या दाव्यानुसार, बनसोड याने फोटो काढले याचा राग येऊन मिथिलेश उमरकर आणि त्याच्या तीन साथीदारांनी बनसोड आणि राऊत यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, जातीवाचक शिवीगाळ केली आणि मोबाईल हिसकावून घेतला.
Also Read: बोगस कर्जमुक्ती प्रकरणात केवळ सात लाभार्थी विरोधात गुन्हे दाखल होणार?
“अरविंद बनसोड खाली पडून होता. थोड्या वेळाने स्वतःला सावरत उभा राहिला. मी उमरकर यांच्याकडून मोबाईल आणतो, तू गाडीत पेट्रोल भरून आण, असे सांगून बनसोडे याने राऊत याला पेट्रोल पंपावर पाठवले. राऊत परत आला तेव्हा बनसोडे जमिनीवर पडलेला होता. त्याच्या बाजूला कीटकनाशकाची (pesticide) बाटली पडलेली होती आणि संशयित आरोपी उमरकर बाजूला उभा होता,” असा दावा दीपक केदार यांनी केला.
केदार पुढे म्हणतात, “बनसोड पडलेला पाहून आजूबाजूला गर्दी वाढली. म्हणून उपरकर यानेच बनसोड याला गाडीत बसवून दवाखान्यात नेले. जाताना त्याने कीटकनाशकाची बाटलीही सोबत नेली. राऊत याने आग्रह करूनही उमरकर याने राऊतला गाडीत सोबत घेतले नाही. उपचार सुरू असताना बनसोडे दि. ३१ मे रोजी मृत्यू पावला.
दलित पँथर सेनेचे दीपक केदार यांनी जलालखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डेकाले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. डेकाले आधी तक्रार दाखल करुन घेतली नाही. बनसोडेच्या मृत्यूनंतर तक्रार नोंदवून घेऊ, असे उत्तर दिले. रुग्णालयात जाऊन बनसोडे याचा मृत्यूपूर्व जबाब नोंदवला नाही. एचपी गॅस एजन्सीच्यासमोर असलेले सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) तपासले नाहीत. जातीवाचक शिवीगाळ केलेली असताना अट्रोसिटी कलम न लावता केवळ भारतीय दंड संहिता कलम ३०६ आणि ३४ लावले. दि २९ मे रोजी प्रथम दर्शनी अहवाल (FIR) दाखल झाला असतांना संशयित आरोपीला तत्काळ अटक केली नाही. प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची साक्ष घेतली नाही.
संशयित आरोपी उमरकर हा गृहमंत्री देशमुख यांच्या निकटचा कार्यकर्ता असल्यामुळे पोलिसांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला का? पोलिसांवर देशमुख यांचा दबाव होता का? संशयित आरोपीला एका दिवसात अटकपूर्व जमीन कसा मिळाला? असे प्रश्न केदार यांनी उपस्थित केला आहे.
रोहित वेमुलाची (Rohit Vemula) हत्या आणि बनसोडे याची हत्या ही राजकीय आणि सामाजिक हत्या असून जातीयवाद आणि सत्तेच्या मस्तीतून झालेली आहे, असा आरोप केदार यांनी केला आहे. वैजापूर येथील भीमराज गायकवाड हत्याकांड, पारधी समाजातील तीन जणांचे हत्याकांड आणि आता अरविंद बनसोडे याचे हत्याकांड हे गृहमंत्री अनिल देशमुख यांची निष्क्रियता सिद्ध करते. त्यामुळे त्याचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी केदार यांनी केली आहे.
ऍड प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला वाचविण्यासाठी प्रकरण दाबले जाते आहे, असा आरोप केला असून चौकशी अन्य अधिकाऱ्याकडे सोपवली जावी, अशी मागणी केली आहे.