पालकमंत्री जयंत पाटील कोणाला पाठीशी घालत आहेत? : मनसे

सांगली (Sangli)जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथील बोगस कर्जमुक्ती प्रकरणी पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्यांच्या नवावर शेती नाही, सात-बारा उतारा नाही, अशा  गोटखिंडी येथील सुमारे नऊ व्यक्तींना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती (Loan waiver scheme) योजनेतंर्गत प्रत्येकी किमान ९० हजार ते दोन लाख रुपयांचा लाभ झाला होता. मात्र, पाटील यांनी केवळ सात लाभार्थीविरोधात गुन्हे नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. पाटील कोणाला पाठीशी घालत आहेत का? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) उपस्थित केला आहे. TheNews21  ने या गैरव्यवहारासंदर्भात दिनांक 1 जून रोजी बातमी प्रसिद्ध केली होती.

वाळवा तालुक्यातील या बोगस कर्जमुक्ती योजनेची दखल घेऊन पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हा सहकार उपनिबंधक नीलकंठ करे यांची चौकशी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल आज जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. त्याच अहवालाचा आधार घेत मंत्री पाटील यांनी गोटखिंडी येथील विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव आणि संबंधित लाभार्थी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. विरोधी पक्ष नेते (LoP) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हे आणि यासारखे बोगस लाभार्थी प्रकरण धसास लावू, असा इशारा दिला होता.

पाटील म्हणाले, सातबारा नसताना बनावट पद्धतीने कर्जमाफी केली गेली आहे. अन्य काही शेतकऱ्यांना या कर्जमुक्तीचा लाभ देताना ती चुकीच्या पद्धतीने किंवा त्यांनी घेतलेल्या कर्जापेक्षा अधिक रक्कम दिली गेली आहे. याबाबत चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात अशा घटना घडल्या असतील, अशी शक्यता गृहीत धरून सर्व लाभार्थींची यादी तपासावी अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. 

Also Read: मंत्री जयंत पाटील यांच्या सांगलीत शेतकरी कर्जमुक्ती योजनेला भ्रष्टाचाराची कीड

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे (Kirtikumar Shinde) यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. शिंदे यांनी गावातील सजग नागरिक सूरज शेवाळे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करून संपूर्ण लाभार्थींची चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती.

दरम्यान, TheNews21  शी बोलताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गोटखिंडी प्रकरण गंभीर असल्याची प्रतिक्रिया दिली होती. “आपल्याकडेही अशाअनेक बोगस लाभार्थींची माहिती प्राप्त झाली आहे. सध्या कोरोना (coronavirus) संकट असल्याने आम्ही आता फक्त माहिती घेत आहोत. योग्य वेळी हा सर्व गैरप्रकार बाहेर काढून सरकारला जाब विचारू,” असे फडणवीस म्हणाले.


पालकमंत्री कोणाला पाठीशी घालत आहेत?


दरम्यान, पालकमंत्री पाटील यांनी दिलेल्या आदेशामुळे, विका सोसायटी सचिव अनिल पाटील यांच्यासह सात बोगस लाभार्थीच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. परंतु, सोसायटी चेअरमन धनाजी थोरात यांच्यासह कर्जमुक्तीचा लाभ घेणारा पोलीस अधिकारी यांच्यावर काय कारवाई होणार याबाबत पाटील यांनी कुठलाही खुलासा केलेला नाही. सरकारी नोंदीनुसार ९ बोगस लाभार्थीनी कर्जमुक्तीचा लाभ घेतला असताना केवळ सात लाभार्थी विरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश देणारे पालकमंत्री जयंत पाटील कोणाला पाठिशी घालत आहेत? असा प्रश्न मनसेचे किर्तीकुमार शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here