@maharashtracity

मुंबई: राणीच्या बागेतील वाघांप्रमाणेच पेंग्विनची देखभालही कर्मचारी करू शकतात. देखभालीवरील खर्चापोटी तब्बल १५ कोटी रुपयांची उधळपट्टी कोणासाठी, कोणाचा बाळहट्ट पुरविण्यासाठी, असा संतप्त सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mahit Kishori Pednekar) यांना पाठवलेल्या पत्रात उपस्थित केला आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी, राणी बागेतील पेंग्विनच्या (Penguin in Rani baug) देखभालीसाठी पालिकेने काढलेल्या १५ कोटी रुपयांचा त्रैवार्षिक खर्च हा योग्यच असून त्याबाबतचे टेंडरही योग्यच असंल्याचे सांगत जोरदार समर्थन केले आहे.

सध्या पालिका वर्तुळात राणी बागेतील पेंग्विनवरील खर्चासाठी १५ कोटी रुपयांच्या खर्चावरून भाजप (BJP) व काँग्रेस (Congress) यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. त्यांनी या १५ कोटींच्या खर्चाबाबतच्या टेंडरप्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली आहे.

त्यावर महापौर पेडणेकर यांनी बुधवारी पेंग्विनवरील १५ कोटींच्या खर्चाचे समर्थन केले. त्याची दखल घेऊन आमदार नीतेश राणे यांनी, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे नाव न घेता १५ कोटींचा खर्च कोणाचा बाळहट्ट पुरवण्यासाठी, पेंग्विन गॅंगसाठी हा खर्च होणार आहे का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित करीत तसे पत्र महापौर यांना पाठवले आहे.

वास्तविक, पेंग्विन आणल्यापासून पालिकेने सर्वसामान्य जनतेसाठी असलेल्या तिकिटाची किंमत ५ रुपयांवरून थेट ५० रुपये व आई – वडील, दोन मुले ( १२ वर्षांखालील) त्यांच्यासाठी १०० रुपये तिकीटदर केल्याने पर्यटकांनी खऱ्या अर्थाने राणीच्या बागेकडे पाठ फिरवली आहे. तसेच, आता कोरोनाच्या कालावधीत काही निर्बंधात शिथिलता आणताना राणी बागेचे दरवाजे बंदच ठेवले असल्याने कोणती लहान मुले, पालक, पर्यटक त्या राणी बागेत येणार, पेंग्विन बघणार, असा सवालही आ. राणे यांनी उपस्थित केला आहे.

महापौरांचे उत्तर

पेंग्विनची देखभाल करण्यासाठी तज्ञ लोकांची आवश्यक असते. तेच पेंग्विन संदर्भात सगळ्या गोष्टी जाणू शकतात आणि त्यांच्याशी त्यांच्यासारखे वागू शकतात, असे सांगत
महापौर किशोरी पेडणेकर यांनी पेंग्विनच्या देखभालीच्या खर्चासाठी १५ कोटींच्या टेंडरचे समर्थन केले आहे.

आम्ही कोणाचाही पत्राचा अनादर करीत नाही. सर्व पत्रांची दखल घेतली जाते, असेही त्यांनी म्हटले आहे. नितेश राणे यांचे पत्र मी वाचले पण त्यांना नेमकं काय म्हणायचंय ते कळलेलं नाहीये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here