@maharashtracity

मुंबई: राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना व्हाट्सअप्प वर आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीचा आज विधानसभेत सर्व पक्षीय सदस्यांनी निषेध केला आणि चौकशीची मागणी केली. या चर्चेला उत्तर देतांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विशेष तपास पथक (Special Investigation Team – SIT) स्थापन करून धमकीची सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली. मात्र, आमदारांची समिती नेमण्याची विरोधी पक्षाची मागणी फेटाळून लावली.

शिवसेना सदस्य सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी आदित्य ठाकरे यांना मिळालेल्या धमकीचा (Threat to Aaditya Thackeray) मुद्दा सभागृहात उपस्थित केला. त्यावर प्रारंभी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी उत्तर दिले. मात्र, चर्चेत या मुद्द्याची व्याप्ती वाढत गेली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य नवाब मलिक (Nawab Malik) यांनी थेट सुशांतसिंग राजपूत आत्महत्या (Sushant Singh Suicide) प्रकरण आणि एका तस्कराला भाजप नेत्यांकडून पुरविण्यात आलेल्या नामांकित ब्रँडच्या गाड्या आणि त्यात समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा असलेला सबंध जोडला.

तर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी थेट सनातन संस्थेला (Sanatan Sanstha) यात ओढले आणि या संस्थेवर बंदी घालण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्राला विनंती करावी अशी मागणी केली.

धमकी प्रकरणाचे राजकीयकरण करू नये असा मुद्दा फडणवीस यांनी मांडला आणि आदित्य यांना आलेली धमकी ही बाब गंभीर असल्याचे सांगितले. गरज पडली तर कर्नाटक सरकारशी (Karnataka government) बोलू, अशी ग्वाही देतांना सरकारने सखोल चौकशी करावी अशी मागणी केली.

भाजपचे सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी नवाब मलिक आणि अन्य सदस्यांना मिळालेल्या धमकीकडे लक्ष वेधून आमदारांची समिती नेमून चौकशी करावी अशी मागणी केली.

या चर्चेला दिलीप वळसे पाटील (HM Dilip Walse – Patil) यांनी उत्तर दिले. आदित्य यांना धमकी देणाऱ्याला कर्नाटकातून अटक करण्यात आली असून त्याला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली असल्याची माहिती वळसे-पाटील यांनी दिली.

ते म्हणाले, आमदार आणि सामान्य जनता यांना अशा प्रकारे धमकी येणे हे गंभीर आहे. याबाबत दीर्घकालीन धोरण तयार केले जाईल. तसेच आदित्य यांना आलेल्या धमकीचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक नेमले जाईल अशी घोषणा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here