@vivekbhavsar

केंद्रीय यंत्रणाचा ‘सेटिंग’साठी भाजपकडून वापर – काँग्रेस

मुंबई: दिवाळीनिमित्त महाराष्ट्रसिटीशी (maharashtracity) बोलतांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी बॉम्ब फोडले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांच्या (Central Investigation Agencies) माध्यमातून भारतीय जनता पक्ष (BJP) ‘सेटलमेंट’ करीत असल्याचा आरोप काँग्रेसच्या (congress) वरिष्ठ नेत्याने केला आहे.

तर राष्ट्रवादीच्या (NCP) एका नेत्याने थेट नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (UD Minister Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘प्रशांत’ आणि ‘आशर’ यांचे गॉडफादर असलेले शिंदे यांच्याविरुद्ध भाजपने केंद्रीय तपास यंत्रणा यांना कामाला लावण्याची हिम्मत दाखवावी, असे आव्हान या नेत्याने दिले.

दोन्ही नेत्यांची प्रस्तुत प्रतिनिधीशी दोन स्वतंत्र ठिकाणी झालेल्या भेटीत अनेक बाबींवर खुलासे झालेत. काँग्रेसच्या (Congress) नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. आयकर विभागाच्या (Income Tax Department) धाडी केवळ दिखावा आहे.

या नेत्याचा रोख उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे निकटवर्तीय आणि नातेवाईकांकडे पडलेल्या धाडी आणि जप्त केलेल्या मालमत्ता याकडे होता.

अजित पवार यांचाबद्दल अजूनही संशयाने बघितले जाते. त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे किंवा ‘अन्य’ माध्यमातून ‘सेटलमेंट’ करावी यासाठी भाजपची धडपड असल्याचा दावा या नेत्याने केला.

“इकडे धाडी टाकतात आणि ‘वर’ व्यावसायिक सबंध प्रस्थापित करतात,” असे सूचक वक्तव्य या नेत्याने कोणाचेही थेट नाव न घेता केला. अर्थात असे व्यावसायिक सबंध कागदोपत्री सिद्ध करता येत नाही, असेही हा नेता म्हणाला.

Also Read: दादरा-नगर-हवेली जिंकली; शिवसेनेचे संसदेत संख्याबळ वाढले

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi – MVA) मंत्री किंवा भाजपसाठी विरोधक असलेल्या पक्षातील नेत्यांबाबत भाजपला संशय असेल तर त्यांनी थेट कारवाई करण्याची हिंमत दाखवावी, असे बोलून काँग्रेसचे हे वरिष्ठ नेते म्हणाले, “आमच्यावर कारवाई करा. तृणमूल काँग्रेस (Trinmool Congress) असेल किंवा अन्य बिगर भाजप पक्ष, यांच्या नेत्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखवत नाही. त्यामुळे भाजपच्या पाठिंब्याने केंद्रीय यंत्रणा करत असलेल्या कारवायांबद्दल आणि हेतूबद्दल संशय निर्माण होतो’, असे काँग्रेसचे हे वरिष्ठ नेते म्हणाले.

अजित पवार यांच्यावरील कारवाईबाबत देखील त्यांनी हेच मत व्यक्त केले.

अनिल देशमुख प्रकरणामुळे तणावात असलेल्या राष्ट्रवादीत भाजप आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यातील ‘मधुर’ संबंधांबाबत उघड नाराजी दिसून येते.

“राष्ट्रवादीच्या नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. परंतु, एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद लाभलेले ‘आशर’ आणि ‘प्रशांत’ यांच्यावर टाकलेल्या धाडीत ‘घबाड’ सापडूनही शिंदे यांना हात लावण्याची ना भाजप नेत्यांची आणि ना केंद्रीय यंत्रणांची हिम्मत आहे,” अशा शब्दात या नेत्याने भाजपवर टीका केली.

शिंदे यांच्याविरोधात तपास यंत्रणेकडे पुरेसे धागेदोरे असल्याचा दावा करून हा नेता म्हणाला, तरीही अजित पवार यांना एक न्याय आणि एकनाथ शिंदे यांना दुसरा न्याय दिला जात आहे.

कोणाचेही थेट नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बड्या प्रस्थाने दावा केला की, सप्टेंबर महिन्यातील आयकर विभागाच्या धाडीत एका व्यक्तीकडे गोदरेजचे जुने ‘क्ष’ संख्येतील कपाटे भरून रोकड मिळाली. (कपाटाच्या संख्येची माहिती आयकर विभागाने त्यांच्या अधिकृत पत्रकात नमूद केली नव्हती, त्यामुळे इथे नमूद केलेली नाही)

या रकमेचा स्रोत शोधण्याचे काम केंद्रीय तपास यंत्रणा करेल, अशी आशा करूया. परंतु, ती व्यक्ती कोणासाठी इतकी रक्कम जमा करत होती, हे बाहेर येणे गरजेचे आहे. त्यातून मोठा नेता अडचणीत येऊ शकेल. पण त्याला वाचवण्याचे काम केले जात असल्याचा दावा या नेत्याने केला.

दरम्यान, शिंदे यांचीही आयकर विभागाने तर महसूल (revenue) आणि आदिवासी विभागाने (Tribal department) शिंदे यांच्या मालमत्तेची चौकशी करायला हवी आहे, अशी अपेक्षा या नेत्याने व्यक्त केली.

तुम्ही उघडपणे ही मागणी का करत नाही, या प्रश्नावर त्यांनी सध्या सत्तेत एकत्र आहोत, त्यामुळे उघडपणे अशी मागणी करता येत नाही, असे स्पष्ट केले.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलो आहोत, पण शिंदे यांची भाजपशी जास्त जवळीक असल्यामुळे आमच्या पक्षाची अडचण होते, असा दावा या नेत्याने केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here