@maharashtracity

महिला आयोगाने घेतली गंभीर दखल

महापौरांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा

शिवसेना व भाजपकडून पोलिसात तक्रार

मुंबई: वरळी येथील गॅस सिलिंडर दुर्घटनेवरून (Worli gas cylinder blast incident) भाजपचे आ. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप झाला आहे. याबाबत महापौर पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करीत आ. शेलार यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या तक्रारीची गंभीर दखल राज्य महिला आयोगाच्या (State Women’s Commission) अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली आहे.

याप्रकरणी, वस्तुस्थितीदर्शक माहिती अहवाल तयार करून आयोगाला पाठवून देण्याचे निर्देश त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना (Mumbai CP) पत्राद्वारे दिले असल्याचे समजते.

वरळी येथील गॅस सिलिंडर दुर्घटनेत जखमी मंगेश पुरी (४ महिने) या लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू अवघ्या २४ तासांत झाला. त्यानंतर त्याचे वडील आनंद पुरी यांचा आणि त्यानंतर त्याची आई विद्या पुरी यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आता त्यांचा दुसरा जखमी मुलगा विष्णू (५) हा कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असून तो एकटा पडला आहे. कदाचित त्याला माहितीही नसेल की, त्याचा लहान भाऊ, आई – वडील हे त्याला सोडून गेले आहेत.

वास्तविक, या दुर्घटनेला नायर रुग्णालयातील (Nair Hospital) संबंधित दोन डॉक्टर व एक नर्स हे कारणीभूत आहेत. त्यांनी वेळीच लक्ष दिले असते व त्या चौघांवर वेळीच उपचार दिले असते तर आज ही परिस्थिती ओढवली नसती. एकीकडे ही एवढी गंभीर व दुःखद घटना घडत असताना दुसरीकडे सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena) व पालिकेतील पहारेकरी भाजप (BJP) यांचे नगरसेवक पालिका सभेत थेट भिडले आहेत.

आता या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. त्यातून सेना — भाजपचे नेते, लोकप्रतिनिधी हे एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप, चिखलफेक करीत आहेत.

महापौरांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य

वरळी येथील गॅस सिलिंडर दुर्घटनेनंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळाला काहीशी उशिराने भेट दिली. त्यावर आक्षेप घेताना भाजपचे आ. आशिष शेलार यांनी, सिलिंडर स्फ़ोटाच्या ७२ तासांनंतर महापौर घटनास्थळी पोहोचतात. एवढे तास कुठे xxx होतात, असा सवाल आ. आशिष शेलार यांनी महापौर यांना केला, असा शेलार यांच्यावर महापौरांचा आरोप आहे.

त्यामुळे महापौरांनी, याप्रकरणी आ. शेलार यांच्या विरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.

महिला आयोगाकडून दखल व कार्यवाहीचे निर्देश

महापौर किशोरी पेडणेकर यांच्या तक्रारीची गंभीर दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी घेतली आहे. मुंबई पोलीस आयुक्त यांना याप्रकरणी सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे व त्याबाबतचा अहवाल राज्य महिला अयोगाला सादर करण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले आहेत.

महिला लोकप्रतिनिधी संदर्भात केलेली कोणतीही अवमानकारक वक्तव्य अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

मुंबई पोलिसांकडे शिवसेना व भाजपकडून तक्रार दाखल

भाजप आ. आशिष शेलार यांनी महापौर यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेनेकडून पालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत, महिला विभाग प्रमुख मीना कांबळी यांच्या शिष्टमंडळाने कायदेशीर कार्यवाहीसाठी मुंबई पोलीस मुख्यालयात सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare-Patil) यंच्याकडे लेखी तक्रार दिली आहे.

तर, आ.आशिष शेलार यांनी, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केलेले नसताना त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या वक्तव्याची तोडफोड करून चुकीची माहिती पसरवून महापौर यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जात असून त्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी भाजपच्या महिला नगरसेवक राजेश्री शिरवाडकर व अन्य नगरसेविका यांच्या शिष्टमंडळाने सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यंच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here