Twitter : @maharashtracity

मुंबई: लोकशाहीचे पवित्र मंदिर म्हणून गौरविण्यात येणाऱ्या भारतीय संसदेच्या नूतनवास्तूचे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती दिनी म्हणजेच २८ मे, २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होत आहे, ही अत्यंत अभिमानाची घटना आहे. मात्र या ऐतिहासिक समारंभावर बहिष्कार घालण्याची काही विरोधी पक्षांची कृती ही अत्यंत गैर आणि त्यांच्यातील वैफल्यग्रस्ततेची निदर्शक आहे, असे मत महाराष्ट्र विधानसभचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले आहे.

ॲड.राहुल नार्वेकर म्हणाले की, संसदीय कार्य प्रणालीत सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष अशा दोहोंचा सहभाग महत्वाचा मानला जातो. संसदेच्या माध्यमातून लोकहिताच्या प्रश्नांना न्याय दिला जातो, राष्ट्रीय प्रश्न सोडविले जातात, धोरण निश्चिती होते. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे संसदेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन होत असताना विरोधी पक्षांनी बहिष्कार घालणे उचित होणार नाही. भारत हा जगातील सर्वात मोठा संसदीय लोकशाही असलेला देश म्हणून ओळखला जातो. त्या देशाच्या संसदेच्या नूतन वास्तूचे देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होत असताना अशाप्रकारे गालबोट लावले जाणे सर्वथा अनुचित आहे.

भारतातील एका राज्याच्या विधानसभेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन कोणत्याही संविधानिक पदाची जबाबदारी त्यावेळी ज्यांच्याकडे नव्हती अशा व्यक्तीच्या हस्ते करण्यात आलेले आहे. मात्र सर्वच पक्षीय प्रतिनिधी, नेते त्यावेळी उपस्थित होते. “देशाचे पंतप्रधान” या संवैधानिक पदावरील नेत्याच्या हस्ते हा ऐतिहासिक समारंभ आता होत असताना काहींच्या पोटात का दुखत आहे, असा सवालही विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here