@maharashtracity

चुप्पी साधलेल्या शिवसेनेला भाजपने आणले अडचणीत

मुंबई: मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि काँगेस नेते असलम शेख (Aslam Shaikh) यांच्याहस्ते मालाड येथील उद्यानाला टिपू सुलतान (Tipu Sultan) असे नाव देण्यात आल्यानंतर उठलेल्या वादात शिवसेनेने (Shiv Sena) पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली नाही. सेनेने या प्रकरणी तोंड गप्प ठेवल्याने सेनेला आणि महापौर यांना ही नामकारणाची भूमिका मान्य आहे का? असा खोचक प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे.

भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे (BJP group leader Prabhakar Shinde) यांनी म्हटले आहे की उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यास भाजपने कडाडून विरोध केला. मात्र, शिवसेनेची भूमिका संशयास्पद आहे. त्या मैदानाला टिपू सुल्तान यांचे नाव देण्यास शिवसेना उघड विरोध करीत नाही. महापौर यांनी कोलांटउडी घेतली आहे.

वास्तविक, शिवसेनेने टिपू सुल्तान यांच्या नावाला एकतर खुले समर्थन तरी द्यावे अथवा ते नामकरण बेकायदेशीर ठरवून त्या प्रकरणी कायदेशीर कारवाई तरी करावी, अशी मागणी करून भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी शिवसेना व महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांची चांगलीच कोंडी केली आहे.

मालाड (Malad) येथील उद्यानाची ती जागा जर सांडपाणी प्रकल्पासाठी राखीव होती तर मग त्या आरक्षणात कोणी बदल केला ? या उद्यानाचे नामकरण करण्याबाबतचा ठराव राज्य शासनाने की मुंबई महापालिकेने (BMC) मंजूर केला आहे? या नामकरणाला महापौरांचा पाठींबा आहे का? नामकरण कायदेशीर की बेकायदेशीर आहे? अशा एकापेक्षा एक प्रश्नांची सरबत्ती करीत प्रभाकर शिंदे यांनी शिवसेनेला खिंडित पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

त्या मैदानाला टिपू सुल्तान यांचे नाव देण्याचा भाग जर कायदेशीर असेल तर तशी कागदपत्रे सादर करावी किंवा बेकायदेशीर असेल तर त्यावर कारवाई करावी, असे सांगत प्रभाकर शिंदे यांनी शिवसेनेला चांगलेच अडचणीत आणले आहे.

मुंबईतील दोन रस्त्यांना टिपू सुल्तान यांची नावे देण्याबाबतचे दोन प्रस्ताव भाजप नगरसेवकांनीच सहकार्य करून मार्गी लावले, असा महापौर यांनी केलेला आरोप खोटा आहे. त्या दोन्ही प्रकरणात भाजपने कोणतेही सहकार्य केलेले नाही. आमदार अमित साटम यांचे नाव व स्वाक्षरी असलेल्या कागदांवर खोडसाळपणा करण्यात आल्याचा आरोपही प्रभाकर शिंदे यांनी यावेळी केला. तसेच, या प्रकरणी आमदार अमित साटम हे कायदेशीर कारवाई करणार असल्याचे प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.

भाजपने मांडलेल्या ठरावाच्या सूचनांचे काय?

दिनांक २२ जुलै २०२१ रोजी “एम / पूर्व विभागातील बाजीप्रभू देशपांडे मार्गापासून सुरु होऊन रफिनगर नाल्यापर्यंत जाणाऱ्या शिवाजीनगर मार्ग क्र.४ ह्यास ‘शहीद टिपु सुलतान मार्ग’ असे नाव देण्याबाबत, महापालिकेने आपला २७ डिसेंबर २०१३ चा ठराव क्र. १२९० अन्वये घेतलेल्या निर्णयाचा, महापालिका, याद्वारे, फेरविचार करीत आहे. तसेच अंधेरी (प) येथील भवन्स महाविद्यालयापासून सुरु होऊन गिल्बर्ट हिल मार्गे सी.डी. बर्फिवाला मार्गाच्या नाक्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्यास ‘शेर-ए- हैसूर टिपु सुलतान मार्ग’ असे नाव देण्याबाबत, महापालिकेने आपला २३ एप्रिल २००१ चा ठराव क्र. ५२ अन्वये घेतलेल्या निर्णयाचा, महापालिका, याद्वारे, फेरविचार करीत आहे. या ठरावाच्या सूचना विचारार्थ का घेण्यात आल्या नाहीत, असा सवाल प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित करीत शिवसेनेला फैलावर घेण्याचा प्रयत्न केला.

तसेच, शिवसेनेत जर एवढीच हिंमत असेल तर , भाजपने मांडलेल्या दोन्ही ठरावांचा फेरविचार करण्यास मंजुरी द्यावी, असे आव्हान स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट (Bhalchandra Shirsat) यांनी शिवसेनेला दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here