@maharashtracity

हरकती, सूचना नोंदवणार

मुंबई: मुंबई महापालिकेच्या (BMC) प्रभाग पुनर्रचना मान्य नसल्याने भाजप काही प्रभागांबाबत हरकती व सूचना नोंदविणार आहे. त्यास पालिकेने योग्य न्याय न दिल्यास न्यायालयात दाद मागू, असा इशारा भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे (BJP leader Prabhakar Shinde), आमदार मिहीर कोटेचा, आमदार राजहंस सिंह व भाजपचे पालिका पक्षनेते विनोद मिश्रा यांनी दिला आहे.

आगामी निवडणुकीसाठी महापालिकेने वाढीव प्रभागांसह एकूण २३६ प्रभागांना मान्यता देत अनेक प्रभागात पुनर्रचना (restructuring of wards) केली आहे. त्यापैकी काही प्रभागात बदल केले आहेत. त्यामुळे शिवसेनेला (Shiv Sena) जास्त लाभ मिळणार असून भाजपला नुकसानदायक ठरणार आहे, असा दावा भाजपकडून केला जात आहे.

यासंदर्भात प्रभाकर शिंदे म्हणाले, पालिकेच्या निवडणुकीसाठी २३६ प्रभागांचे पुनर्रचना प्रारुप जाहीर करण्यात आले आहे. पुनर्रचनेत सर्व प्रभागांचे क्रमांक बदलण्यात आले असून सिमारेषाही बदलल्या आहेत. त्यात भाजपचे मुलुंड येथील नगरसेवक निल सोमय्या (Neil Somaiya) यांच्या प्रभागात जाणीवपुर्वक बदल करण्यात आले आहेत. तसेच, माझ्या व भाजपच्या आणखीन काही नगरसेवकांच्या प्रभागातही काही भाग बदलण्यात आला आहे. राजकीय हेतूने प्रभाग पुनर्रचना करण्यात आली आहे. त्याचा फटका भाजपच्या नगरसेवकांना बसणार आहे.

वास्तविक, प्रभाग पुनर्रचना करताना हायवे, रेल्वे मार्ग, रस्ते, नाले यांबाबत जे काही नियम आहेत त्यांचे उल्लंघन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रभाकर शिंदे व आमदार मिहीर कोटेचा (BJP MLA Mihir Kotecha) यांनी दिली. या प्रभाग पुनर्रचनेविरोधात भाजप नगरसेवक हरकती व सूचना देणार आहेत, असे प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.

माझा वार्ड मुलुंडमध्ये असून रेल्वेच्या दोन्ही बाजूला विभागण्यात आला आहे. माझा विभाग ५ किलोमीटर इतका करण्यात आला आहे. रेल्वेच्या पलीकडील ३० ते ४० टक्के भाग त्यांच्या विभागात समाविष्ट केला आहे. तसेच, शिवसेना व महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) घटक पक्षाच्या नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणारे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे चिरंजीव व नगरसेवक निल सोमय्या यांनाही या प्रभाग पुनर्रचनेचा फटका बसणार आहे.

निल सोमय्या ज्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात त्या प्रभागातील १० बूथ काढून माझ्या यांच्या प्रभागात समाविष्ट करण्यात आले आहेत. यामुळे निल सोमय्या यांच्या विभागात ४७ हजार मतदार तर माझ्या प्रभागात ६० हजार मतदार झाले आहेत, अशी माहिती प्रभाकर शिंदे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here