@maharashtraciy

धुळे: ईडी, सीबीआय आणि आयकर या यंत्रणांनी स्वतःची पातळी सोडली आहे. या यंत्रणा अधिकरी नव्हे तर भारतीय जनता पक्षाचे राज्यकर्ते चालवितात. (BJP is controlling ED, CBI, IT) या यंत्रणांकडून वारंवार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर छापे टाकले जात आहेत. आजपर्यंत टाकलेल्या छाप्यांमध्ये नेमके काय घबाड सापडले हे उघड करा, असे आव्हान जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तपास यंत्रणांना दिले आहे.

तर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांनी कोरोना लस आणि इंधन दरवाढीचा संबंध जोडल्याचा धागा पकडत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोना लस तुम्हाला केवढ्यात पडली हे घरी जावून तपासा, असे जनतेला सांगत केंद्राला टोला लगावला.

धनगर ठेलारी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजीक न्यायमंत्री धनंजय मुुंडे, ठेलारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शिवदास वाघमोडे यांच्या उपस्थितीत साक्री शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी जिल्हास्तरीय मेळावा झाला.

या मेळाव्यात महाआघाडीच्या नेत्यांनी केंद्रातील मोदी सरकार विरोधात सडकून टिका केली. यावेळी ना.जयंत पाटील म्हणाले की, या देशामध्ये शेतकर्‍यांवर अत्याचार होत असल्याने त्याच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी बंद पुकारला. बंदचे पडसाद धाडीतून उमटले.

बंद पुकारल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर धाड टाकण्यात आली. अनेकवेळा धाड टाकणार्‍या यंत्रणेने आधी आणि आता धाडीमध्ये काय सापडले हे सांगावे, असे आव्हानच जयंत पाटील यांनी दिले.

कोरोना लस घेतल्यानंतर मिळणार्‍या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो असतो. लस मोफत असल्याने प्रमाणपत्र फोटोसह जनतेने स्वीकारले. पण आता पेट्रोलियम मंत्र्यांनी कोरोना लसीसाठी इंधन दरवाढ केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जनतेला जी लस दिली गेली. ती मोफत नव्हतीच हे स्पष्ट झाले आहे. यातून जनतेची फसवणुक झाली आहे.

केंद्रातील भाजपा सरकार ईडी आणि तपास यंत्रणांचा वापर करुन घेत आहे. तालुका पातळीवरील एखादा पोलिस ज्या प्रकारे कारवाई करतो त्याप्रमाणे इडीकडून कारवाई होत असल्याने हे सर्व हास्यास्पद आहे, असेही ना.पाटील म्हणाले.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, धनगर आणि ठेलारी समाजाच्या मागण्या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल. राज्यातील या समाजाच्या सर्व संघटनांना एकत्र बोलवून समस्या जाणून घेवून त्यावर काम केले जाईल.

राज्यातील आणि देशातीलच शेतकरी अडचणीत असताना त्यांच्या अंगावर गाडी घातली जाते. हे निषेधार्ह आहे. गेल्या 7 वर्षांपासून केंद्रात भाजपा सरकार सत्तेवर आहे. शेतकरी व त्यांच्यावर अवलंबून असणार्‍याना नष्ट करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करीत आहेत.

पेट्रोलियम मंत्र्यांच्या विधानाचा समाचार घेताना मुंडे म्हणाले की, लस केव्हढ्याला पडली याचा विचार आता जनतेने घरी जावून केला पाहिजे. देशातील ही व्यवस्था बदलण्यासाठी शेतकरी आणि कष्टकर्‍यांनी एकत्र येण्याची गरज आहे.

धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे म्हणाले की, इडीमुळे भाजपा वेडी झाली आहे. भाजपामधील भ्रष्ट लोकांच्या नावांची यादी माझ्याकडे आहे. त्या मी आपल्या नेत्यांकडे दिल्या आहेत. एसीबी आणि सीआयडी या संस्था राज्याकडे असल्याने नखशिखांत भ्रष्टाचारात बुडालेल्या भाजपा नेत्यांवर कारवाई झाली पाहिजे.

धुळे जिल्ह्यातही भ्रष्टाचारात बुडालेले नग असल्याचा उल्लेख करत गोटेंनी दोंडाईचा व जामनेरचा उल्लेख केला. त्यांचा बंदोबस्त करा असे ना.पाटील यांना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here