@maharashtracity

भाजपचे पक्षनेते विनोद मिश्रा यांनी केंद्रीय मंत्र्यांना लिहिले पत्र

मुंबई: राणीबागेत परदेशातून दुर्मिळ प्राणी आणण्याच्या निविदेत १०६ कोटी रुपयांची अनियमितता (irregularities in bidding) झाली असून ही निविदा प्रक्रिया तातडीने थांबविण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे मुंबई महापालिकेतील भाजप नेते विनोद मिश्रा (BJP Corporator Vinod Mishra) यांनी केली आहे. याबाबत केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने चौकशी करावी, अशी मागणी मिश्रा यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव (Union Minister Bhupendra Yadav) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मिश्रा यांनी पत्रात नमूद केले आहे की, मुंबई महापालिकेत (BMC) कंत्राटदारांच्या टोळीने आता परदेशातून दुर्मिळ प्राणी आणण्याचे टेंडर काढले आहे. राणीबागेत जॅग्वार, चिता, पांढरा सिंह, चिंपांझी यांसारखे प्राणी आणण्यासाठी मुंबई पालिकेने निविदा मागवल्या आहेत.

महापालिकेच्या नियमानुसार १०० कोटींहून अधिक रकमेच्या निविदेत सहभाग घेता येतो, त्यामुळे १८५ कोटींच्या निविदेचे दोन भाग झाले आहेत. या निविदेत अनियमितता होत असून, १०० कोटींहून अधिकच्या निविदा ठेकेदाराकडून भरल्या जाणार असल्याचे विनोद मिश्रा यांनी म्हटले आहे.

श्री. मिश्रा यांनी या संदर्भात २१ ऑक्टोबर रोजी महापालिका आयुक्तांना (BMC Commissioner) पत्र पाठवले होते. याबाबत श्री. मिश्रा म्हणाले, २९ नोव्हेंबर रोजी निविदा उघडण्याच्या वेळी आम्ही व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला आहे. हायवे (९१ कोटी) आणि स्कायवे (९४ कोटी) नावाच्या कंपन्यांनी अंदाजित दराने ६० टक्क्यांहून अधिक म्हणजे १०० कोटींहून अधिक रक्कमेच्या निविदा भरल्या आहेत.

अशाप्रकारे महापालिकेत पद्धतशीरपणे १०६ कोटींहून अधिकचा घोटाळा होण्याची शक्यता आहे, असा आरोप मिश्रा यांनी केला आहे. १८८ कोटींच्या बोलीसाठी २९४ कोटींची निविदा सादर करण्यात आली आहे. या संदर्भात महापालिका आणि पेंग्विन टोळीने अतिशय निकृष्ट काम केले असून या १०६ कोटी रुपयांच्या लुटीबाबत आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रारही केली आहे, असे मिश्रा म्हणाले.

महापालिकेकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने यासंदर्भात आम्ही केंद्रीय मंत्र्याकडे पत्राद्वारे तक्रार केली असल्याचे स्थायी समिती सदस्य विनोद मिश्रा यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here