@maharashtracity

आता तरी मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीबद्दल वावड्या थांबतील

नवीन वर्षाची मुंबईकरांना दिली ही भेट

मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळाच्या नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) संपूर्ण कालावधीत अनुपस्थित राहिलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज अत्यंत प्रसन्न चेहऱ्याने, मानेला पट्टा न लावता आणि पाठीमागे कुशनचा सहारा न घेता सरळ बसून नवरविकास विभागाच्या व्हिडीओ कॉन्फरन्स (Video Conference) बैठकीला सामोरे गेल्याचे दिसून आले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आरोग्याबद्दलच्या वावड्या आता थांबतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आरोग्याबद्दल शंका व्यक्त करतांना एकनाथ शिंदे (UD Minister Eknath Shinde) यांच्याकडे मुख्यमंत्री पद सोपवावे अशी सूचना आज केली. ठाकरे लवकर बरे होवोत अशा शुभेच्छा देतांनाच शिंदे हे सक्षम नेते आहेत, त्यांच्याकडे जबाबदारी द्या, अशा मागणीचा पुनरुच्चार केला.

दरम्यान, एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या नगर विकास विभागाच्या (Urban Development Department) व्हीसी ला उपस्थित होते.

या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी 500 चौरस फुटापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घरात राहणाऱ्या मुंबईकर नागरिकांची 100 टक्के मालमत्ता करातून (Exemption in property tax) सुटका केली आहे.

मुंबईतील 16 लाख 14 हजार मुंबईकरांचा मालमत्ता कर रद्द झाला आहे. या निर्णयामुळे मुंबई महापालिकेला 465 कोटी रुपयांच्या उत्पन्नावर (revenue from property tax) पाणी सोडावे लागणार आहे.

हा निर्णय 1 जानेवारी 2022 पासून लागू व्हावा अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अपेक्षा व्यक्त केली. तर हा निर्णय आर्थिक वर्षांपासून म्हणजे 1 एप्रिल 2022 पासून लागू होऊ शकेल, असे नगरविकास सचिव महेश पाठक (UD Secretary Mahesh Pathak) यांनी सांगितले.

हा निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाला मुंबई महापालिका अधिनियम 1888 तसेच वृक्ष उपकर आणि शिक्षण उपकर कायद्यात सुधारणा करावी लागणार आहे.

मुंबईकरांना 2017 च्या महापालिका निवडणुकीत (BMC Polls) दिलेले वचन पूर्ण केले आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here