@maharashtracity

मुंबई: येत्या १० डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विधान परिषदेवर (Legislative Council) मुंबईतून दोन आमदार निवडून देण्यासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत ऐनवेळी उडी घेणाऱ्या अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्यास भाजप, शिवसेना व अपक्ष उमेदवार यांच्यात तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे.

तर दुसरीकडे, या निवडणुकीत भाजपने (BJP) काँग्रेसची (Congress) मते फोडण्याचा तर अपक्ष उमेदवाराला छुपा पाठींबा देणाऱ्या काँग्रेसमधील एका गटाने भाजपची काही मते फोडणार असल्याचा दावा केला आहे.

शिवसेनेतर्फे सुनील शिंदे (Sunil Shinde of Shiv Sena), भाजपतर्फे राजहंस सिंह (Raj Hans Singh) यांनी आणि काँग्रेस गटाकडून छुपे समर्थन असलेले सुरेश कोपरकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीचा निकाल १४ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.

सुरेश कोपरकर यांना छुपा पाठींबा देणाऱ्या पालिकेतील काँग्रेस गटाच्या एका नगरसेवकाने या निवडणुकीत भाजपच्या काही नगरसेवकांना फोडून विरोधी मतदान करण्यास भाग पाडणार असल्याचा दावा केला. त्याबाबतची काही गणिते मांडण्याचा प्रयत्न सुरू आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी (NCP), समाजवादी (Samajwadi Party) व एमआयएम (AIMIM) यांची एकूण मते व उर्वरित मतांसाठी भाजपची काही मते फोडून सुरेश कोपरकर यांना विजयी करण्याचा मानस असल्याचे या नगरसेवकाने सांगितले.

तर, दुसरीकडे भाजप गटाकडून, काँग्रेसची काही मते फोडून अधिकची मते मिळवून मोठ्या फरकाने विजय मिळविण्याचा दावा करण्यात आलेला आहे.

दिनांक २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. अपक्ष उमेदवार कोपरकर यांनी अर्ज मागे न घेतल्यास तिरंगी लढत होऊन विरोधी मतदान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे या निवडणुकीत वेगळे चित्र दिसू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here