By Sadanand Khopkar

Twitter : @maharashtracity

मुंबई: मुंबईत चालत्या लोकलमध्ये एका विद्यार्थीनीवर झालेला लैंगिक अत्याचार संताप आणणार आहे. राज्यात सरकार, गृहखाते, पोलीस नावाची काही यंत्रणा जिवंत आहे का? असा प्रश्न पडला आहे. मुंबई शहरातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना लाजीरवाण्या आहेत. डबल इंजिनचे सरकार महाराष्ट्रात नापास झाले असून चालत्या लोकलमध्ये मुलीवरील लैंगिक अत्याचाराने मुंबईच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली आहेत, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना सव्वालाखे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. राज्यात खून, दरोडे, बलात्कार, दंगली यांचे प्रमाण वाढत आहे. पण पोलीस यंत्रणा व सरकार कुंभकर्णी झोपेत आहे, त्यांच्यावर कशाचाही परिणाम होत नाही, डबल इंजिनच्या सरकारने निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. चर्चगेटजवळच्या महिला वसतिगृहातील मुलीवर अत्याचार होऊन आठवडाही झाला नाही, मुंबईतच मनोज साने नावाच्या नराधमाने महिलेची क्रूर हत्या करून तिचे तुकडे केले आणि आता पुन्हा लोकलमध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार, या घटना पाहून सरकार खडबडून जागे व्हायला हवे, पण शिंदे – फडणवीसांना कशाचीही चाड राहिलेली नाही.

राज्यातील शिवसेना व भाजपा या सत्ताधारी पक्षातील आपसातील भांडणातून त्यांना राज्यकारभार करण्यास वेळ मिळत नाही तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून चमकोगिरी करण्यातच आघाडीवर असतात. रेल्वे सेवा व रेल्वे सुरक्षा याबाबत त्यांना काही देणे घेणे नाही. सरकारला जर जनाची नाही, मनाची असेल तर महिला सुरक्षेवर लक्ष द्यावे. विशेषतः मुंबईत लोकलमध्ये रात्री उशिरापर्यत मुली, महिला प्रवास करत असतात, याचा गांभिर्याने विचार करुन लोकलमधील रात्रीची सुरक्षा वाढवावी असे सव्वालाखे म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here