@maharashtracity

पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह

धुळे: बहुप्रतिक्षेनंतर अखेर सोमवारी शाळेची घंटा वाजली. प्रचंड उत्साहात स्कूल चले हम… असे म्हणत विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश केला. (School reopened with excitement)

कोरोना संदर्भातील नियमावलींचे पालन करत, पालकांच्या हमी पत्रांच्या आधारे विद्यार्थ्यांना शाळा प्रशासनाने वर्गात बसण्याची परवानगी दिली. यावेळी शाळा प्रशासनाने गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

विशेष म्हणजे शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थी आणि पालक वर्गात प्रचंड उत्साह दिसत होता.

शहरी भागात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करायला राज्य शासनाने परवानगी दिली आहे. शासनाच्या आदेशानुसार सोमवारी धुळे शहरासह जिल्हाभरातील शाळांची घंटा वाजली. शाळा सुरू होणार असल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शाळा प्रशासनाने तयारी केली होती.

वर्गांचे निर्जंतूकीकरण करणे, थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करणे यासह आदी सर्व सुरक्षेच्या व्यवस्था करण्यात आल्यात. सोमवारी सकाळी अनेक पालक आपल्या पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी आले होते. हमी पत्रांची सक्ती असल्याने शाळेनजीकच हमी पत्र भरून ते शाळा प्रशासनाला देण्यात आले.

विद्यार्थ्यांचा ताप मोजण्यासाठी थर्मल स्कॅनिंग करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला गेला. एका बाकावर एक या पध्दतीने विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था करण्यात आली. त्यातून शारिरीक अंतराचे (Physical distance) पालन केले गेलेे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्साह दिसून आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here