@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेत (BMC) काँग्रेसने (Congress) विरोधी पक्ष म्हणून चांगली कामगिरी केली आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस २२७ जागा लढणार असून जास्तीत जास्त जागा जिंकून पालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकविणार आहे. एवढेच नव्हे तर महापौरपदासाठी अधिक मेहनत घेणार असल्याचा निर्धार मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Mumbai Congress President Bhai Jagtap) यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी, काँग्रेसचे पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांनी, महापालिकेत काँग्रेसच्या मदतीशिवाय महापौर निवडून येणार नाही, असा निर्धार व्यक्त करीत सत्ताधारी शिवसेनेला (Shiv Sena) चिमटा काढला. तर काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष चरण सिंह सप्रा यांनी एक पाऊल पूढे जाऊन, यापुढील महापौर काँग्रेसचाच असेल, असा आत्मविश्वास व्यक्त केला.

प्रजा फाउंडेशन या संस्थेने २०१७- २१ या कालावधीत मुंबई महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांच्या कामगिरीचा लेखाजोखा असलेला अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. त्यामध्ये, काँग्रेस पक्षाची कामगिरी एक नंबर असल्याचे व पहिल्या १० नगरसेवकांत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांना सर्वप्रथम क्रमांक, काँग्रेसचे वीरेंद्र चौधरी यांना ५ वा क्रमांक आणि काँग्रेस नगरसेविका मेहेर मोहसीन हैदर यांना ८ वा क्रमांक असल्याचे जाहीर केले आहे.

त्यामुळे बुधवारी मुंबई काँग्रेसतर्फे पक्ष कार्यालयाच्या ठिकाणी प्रथम क्रमांकावरील विरोधी पक्षनेते रवी राजा, वीरेंद्र चौधरी व मेहेर हैदर यांचा भाई जगताप, पालक मंत्री अस्लम शेख (Guardian Minister Aslam Shaikh), शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी, कॉंग्रेसच्या महिला अध्यक्ष अजंता यादव, नगरसेविका पुष्पा कोळी, आशा कोपरकर, श्वेता कोरगावकर, बब्बू खान, ट्युलिप मिरिंडा,माजी नगरसेवक पुरन दोशी, मोहसीन हैदर आदी मान्यवर उपस्थित होते.

यानिमित्ताने मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्याचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी जाहीर केले. तसेच, पालिका निवडणुकीत प्रजा फाउंडेशनच्या अहवालाचा व त्यांनी मुंबई काँग्रेसच्या ३ नगरसेवकांच्या कामगिरीला पहिला १० नगरसेवकांत स्थान दिल्याने या मुद्द्याचा वापर करणार असल्याचे भाई जगताप, चरण सिंह सप्रा व स्वतः रवी राजा यांनीही जाहीरपणे सांगितले.

काँग्रेसच्या हव्यात जास्तीत जास्त जागा -: शिक्षण मंत्री

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला आपले लक्ष्य गाठण्यासाठी आतापासूनच चांगल्या नियोजनाबरोबरच निकराचा संघर्ष करावा लागेल. तसेच, काँग्रेसमधील सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अथक प्रयत्न करून काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचे आवाहन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते यांना केले.

काँग्रेस कामगिरीत अव्वल – पालकमंत्री

मुंबई महापालिकेत काँग्रेसचे काँग्रेस नगरसेवक संख्येने कमी असले तरी त्यांनी पालिकेत चांगली कामगिरी करून विरोधी पक्षनेते रवी राजा, नगरसेवक वीरेंद्र चौधरी, मेहेर हैदर यांनी पक्षाचे नाव व स्वतःचे नाव प्रजा फाउंडेशनच्या अहवालात अव्वल स्थानी आणले आहे, या शब्दात गौरव केला.

काँग्रेसच्या मदतीविना महापौर अशक्य -: रवी राजा

मुंबई महापालिकेत काँग्रेसचे नगरसेवक संख्येने कमी असले तरी त्यांच्यात ‘दम’ आहे, हे प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. आमच्या या कामगिरीचे श्रेय काँग्रेसचे आजी, माजी नेते, मंत्री, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना जाते. पालिकेत काँग्रेसचे नगरसेवक सत्ताधारी शिवसेना, भाजप यांना वरचढ कामगिरी करून दाखवत आहोत. आगामी पालिका निवडणुकीनंतर काँग्रेसच्या मदतीशिवाय पुढील महापौर निवडून येऊ शकत नाही, असा निर्धार विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here