Twitter : @maharashtracity

पुणे: पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानास बीसीसीआय व आयसीसीचे माजी अध्यक्ष, पद्मविभूषण खासदार शरद पवार  यांचे नाव देण्याची मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहितदादा पवार यांच्याकडे केली आहे.

धनंजय मुंडे यांनी रोहित पवार यांना या संदर्भात एक पत्र लिहिले आहे. या पत्रात आयपीएलच्या धर्तीवर एम पी एल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व आमदार रोहित पवार यांचे अभिनंदनही केले आहे.

एमपीएल स्पर्धेत धनंजय मुंडे यांच्या मालकीचा छत्रपती संभाजी किंग्स हा मराठवाड्याचा संघ सहभागी झाला आहे. या संघाच्या सामन्यांच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली आहे. 

मुंबई क्रिकेट असोसिएशन, बीसीसीआय त्याचबरोबर आयसीसीचे अध्यक्ष राहिलेल्या पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार यांचे क्रीडा विश्वात व विशेष करून क्रिकेटमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान आहे. भारतीय महिला क्रिकेटला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देणे, देशासाठी खेळलेल्या निवृत्त क्रिकेटर्सला पेन्शन सुरू करणे यासारखे मोठे निर्णय पवार साहेबांच्या कारकिर्दीत होऊ शकले, याचाही उल्लेख धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात केला आहे.

गुजरातमधील मोटेरा स्टेडियमला ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले, त्याच धर्तीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएनच्या मालकीच्या पुणे येथील गहुंजे स्टेडियमला खा. शरदचंद्र पवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी आ. रोहित पवार यांच्याकडे केली आहे.

मराठवाड्याच्या छत्रपती संभाजी किंग्स या आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी धनंजय मुंडे हे स्वतः मैदानात पूर्णवेळ उपस्थित राहत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here