@maharashtracity

धुळे: धुळे जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीसाठी (By-election for Dhule ZP) सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार मंगळवारी वैध अर्थात पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यापूर्वी ७ जुलैला यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. आता उमेदवारी अर्ज माघारीसाठी मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

धुळे जिल्हा परिषदेचे १५ गट आणि पंचायत समितीच्या ३० गणांसाठी पोटनिवडणूक होते आहे. त्यासाठी दुसर्‍यांदा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी ७ जुलै रोजी वैध उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होेती. मात्र, उमेदवारी अर्ज माघारीसाठी एक दिवस शिल्लक असतानाच निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला. त्यानंतर पुन्हा नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

या कार्यक्रमानुसार मंगळवारी पुन्हा पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १५ गटातून १०७ उमेदवार तर ३० गणातून १८० उमेदवार रिंगणात आहेत. त्यात धुळे तालुक्यात ६०, साक्री तालुक्यात ७०, शिरपूर तालुक्यात २२ तर शिंदखेडा तालुक्यात २८ उमेदवारांचा समावेश आहे.

एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला नाही. स्पर्धा कमी व्हावी या उद्देशाने मातब्बरांकडून माघारीसाठी मनधरणीचे प्रयत्न सुरु झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत २७ सप्टेंबरपर्यंत आहे.

धुळे तालुक्यात सर्वाधिक ११ गट आणि ८ गणांसाठी निवडणूक होणार आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत ही संख्या जास्त होत आहे. तालुक्यातून दोन माजी सभापतींचे सदस्यत्व रद्द झाल्याने त्यांना पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक धुळे तालुक्याभोवती जास्त केंद्रित झाल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here