@maharashtracity

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती

मुंबई: कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी हानी कमी करण्यासाठी ३२०० कोटीचा आपत्ती सौमिकरण प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दिली.

मुंबई शहरासह कोकण किनारपट्टीचा (Konkan coast) परिसर वातावरणातील बदल आणि तापमान वाढीमुळे पाण्याखाली जाईल. तसेच राज्यात दुष्काळ (Drought) व अतिवृष्टीची (Heavy Rain) तीव्रता जाणवेल. हि पर्यावरण विभागाने वर्तवलेली भीती लक्षात घेऊन काय उपाययोजना करण्यात आली असा सवाल विधानपरिषदेत प्रश्नोत्तर काळात उपस्थित करण्यात आला.

यावर उत्तर देतांना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले की मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वातावरणीय बदल परिषद स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून उपाययोजना सुचविल्या आहेत.

दरम्यान पर्यावरणीय बदलामुळे किनारपट्टीला असलेल्या धोक्याबाबत प्रसाद लाड, गोपीचंद पडळकर, सदाशिव खोत, अब्दुल्ला खान दुर्रानी, विक्रम काळे, शशिकांत शिंदे यांनी विविध सवाल उपस्थित केले.

या प्रश्नाला उत्तर देताना पर्यावरणीय मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले कि, राज्य मंत्रिमंडळाने सप्टेंबर महिन्यात घेतलेल्या बैठकीत महाराष्ट्र वातावरणीय बदल परिषद नोव्हेंबर महिन्यात स्थापन केली आहे. यात मुंबई फर्स्ट (Mumbai First) या संस्थेने काही उपाययोजना सुचविल्या असल्याचे सांगितले.

संयुक्त राष्ट्राच्या (UNO) आयपीसीसीच्या (IPCC) अहवालानुसार कार्बनडाय ऑक्साईड (CO2) आणि इतर वायूंच्या अमर्याद उत्सर्जनामुळे १.५० ते २ डिग्री सेल्सिअसएवढी वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच समुद्राच्या तापमानातही वाढ होऊन जागतिक पर्जन्य चक्रावर परिणाम होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे.

या सर्वांचा विचार करता कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाच्या (Cyclon) नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी हानी कमी करण्यासाठी ३२०० कोटीचा आपत्ती सौमिकरण प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली असल्याची माहिती देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here