@maharashtracity

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार

तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली. मात्र, आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. (CM Uddhav Thackeray assures flood affected farmers of Marathwada)

मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा (heavy rain in Marathwada) जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला.

कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवावी असे निर्देश त्यांनी दिले. काही ठिकाणी पुराच्या पाण्यातून जवानांनी ग्रामस्थांची सुटका केली आहे, तसेच या भागातून लोकांचे स्थलांतर व्यवस्थित व्हावे असेही त्यांनी आज सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांशी देखील चर्चा केली असून या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाने नागरिकांच्या बचाव कार्यावर लक्ष द्यावे. तसेच सर्व यंत्रणांत समन्वय ठेवावा असे सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी काल सायंकाळी आणि आज सकाळी देखील मराठवाड्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्र्यांशी या परिस्थितीवर चर्चा केली.

मुख्य सचिव सीताराम कुंटे तसेच मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनाही त्यांनी सूचना दिल्या. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात २६ मिमी पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने विशेषत: मराठवाड्यातले जिल्हे प्रभावित झाले आहेत.

नुकसानीचे पंचनामे सुरू करा

सध्या बचाव व तातडीच्या मदत कार्यास वेग द्यावा व महसूल विभाग, कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत असेही निर्देश त्यांनी दिले. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी फळबागांचेही नुकसान झाले आहेत, शेतपिक वाहून गेले आहेत, ही अभूतपूर्व परिस्थिती आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देऊ नका

निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे. (Students will allow for re-exam of CET) याविषयी विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित माहिती पोहचावा. तसेच नवीन तारखांबाबत माहिती द्या, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here