@maharashtracity

धुळे: लोक अदालतच्या माध्यमातून घरपट्टीचे जमा झालेल्या ८० ते ८५ लाख रुपयांतुन कमीत कमी खडी मुरूम टाकून तरी खड्डे बुजवा व या नरक यातनेतून धुळेकर नागरिकांची सुटका करा. अन्यथा नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर मनपाच्या प्रवेशद्वारात देवीचे घट स्थापन करू, नऊ दिवस अखंड ज्योत लावू, रोज देवीचे भजन कीर्तन करून २४ तास नऊ दिवस शिवसेनेच्यावतीने नागरिकांना आवाहन करून ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे महानगर प्रमुख मनोज मोरे यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रातून दिला आहे.

शिवसेनेच्या वतीने मनोज मोरे यांनी आज मनपा आयुक्त देविदास टेकाळे यांना खुले पत्र लिहले आहे. यात म्हटले आहे की, आजच्या घडीला शहराचा एकही रस्ता खड्डयाशिवाय नाही. संपूर्ण धुळे शहरावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.

प्रचंड अडचणींचा सामना करत नरक यातना भोगणार्‍या देवपूरच्या नागरिकांनी देवपूर नव्हे खड्डेपुर असे नामकरण कधीच करून टाकले आणि ते नामकरण अतिशय योग्य आहे. खड्डेपुरच्या खालोखाल शहराची अवस्था देखील अतिशय बकाल झाली आहे.

गल्ली बोळातील व कॉलनी परिसराचे तर जाऊच द्या परंतु शहराचे प्रमुख रस्ते ज्यात जुने जिल्हाधिकारी कार्यालय नवे जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस मुख्यालय, तहसील कचेरी, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिजामाता हायस्कूल, कमलाबाई हायस्कूल, जेल, पोलीस मुख्यालयाकडून फाशीपूल पर्यंत जाणारा मॉडेल नावाचा रस्ता, साक्री रोड, पारोळा रोड, ८० फुटी रोड, १०० फुटी रोड, खोलगल्ली असे अनेक प्रमुख व उप रस्त्यांची अवस्था अतिशय दयनिय झाली आहे.

शहराचा सर्वांगीण विकास चांगले, रस्ते, गटारी, वेळेवर पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरिकांच्या अधिकार असलेल्या व मनपाची जबाबदारी असलेल्या सर्व मूलभूत गरजा पूर्ण होतील या भाबड्या आशावादावर ५० नगरसेवकांचे दान ज्या भाजपच्या पदरात टाकले, त्या भाजपने कमरेच सोडून डोक्याला बांधून निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे.

धुळेकर नागरिकांना वार्‍यावर सोडून दिले आहे. फक्त खोटे व न केलेल्या कामांचे बिल प्रचंड टक्केवारी घेऊन काढणे, त्यासाठी मनपाच्या फिक्स डिपॉझीटदेखील या नतद्रष्टाना पुरल्या नाहीत. यात मागच्या आयुक्तांनीही लाज सोडली होती.

प्रशासनाच्या संमतीशिवाय हे शक्यच नव्हते.त्यामुळे या अभद्र युतीला आपण दोघे भाऊ चाटून पुसून खाऊ या उक्तीला सत्यात उतरवल्याचे श्रेय जाते. असा आरोप करीत या पत्रात नुतन आयुक्त देविदास टेकाळे यांनी स्वतः लक्ष घालून नुकत्याच शस्तीमाफी योजनेतुन जमा झालेल्या ८० ते ८५ लक्ष रुपयातून एकही बिल न काढता त्यात अजून काही रक्कम टाकून मनपा हद्दीतील धुळे शहरातील खड्ड्यामध्ये चांगल्या दर्जाचा दगडी मुरूम व खडी टाकून तात्पुरती का असेना डागडुजी करून खड्डे बुजवा, अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here