Twitter : @NalavadeAnant
मुंबई

या महिन्याच्या शेवटी ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची मुंबईतील ग्रँड हयात येथे तिसरी महत्वाची बैठक (Third meeting of INDIA in Mumbai) होणार असून या बैठकीला किमान पाच राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहू शकतात. याशिवाय देशभरातील काही महत्त्वाचे नेते मुंबईत येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर आम्ही राज्य सरकारची मदत घेणार आहोत. राज्य सरकारची मदत आम्हाला लागेल. आमचे काही नेते राज्य सरकारशी संवाद साधून नेत्यांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न मार्गी लावतील, अशी माहिती ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Shiv Sena Spokesperson Sanjay Raut) यांनी शनिवारी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

वरळी येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज दुपारी संपन्न झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार, शिवसेना उबाठाचे उद्धव ठाकरे, संजय राऊत, सुभाष देसाई, काँग्रेसच्या वतीने अशोक चव्हाण, नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसेच खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील उपस्थित होते. बैठक संपन्न झाल्यानंतर राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत माहिती दिली.

दोन दिवसीय इंडिया आघाडीच्या या बैठकीनिमित्त ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी डिनर आयोजित करण्यात आले आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे एक सप्टेंबर रोजी सकाळपासून दुपारपर्यंत एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. पाटणा, बेंगलोर आणि आता तिसरी बैठक मुंबईमध्ये होत असल्याने याचे यजमानपद हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray to host the meeting of INDIA in Mumbai) यांच्याकडे असल्याचे राऊत यांनी नमूद केले.

बैठकीची जबाबदारी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi – MVA) विविध पक्षांना वाटून दिल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला देशभरातील महत्त्वाचे नेते येणारच आहेत. यासोबतच पाच राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होणार असून आणि महाराष्ट्रात आमचे सरकार नसल्यामुळे आम्ही महाराष्ट्र सरकारसोबत चर्चा करणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here