By Santosh More
Twitter: @maharashtracity
अयोध्या: महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde in Ayodhya) यांनी आज पहिल्यांदाच आयोध्येत हजेरी लावून राम लल्लाचे दर्शन घेतले आणि महाआरती केली. या अयोध्यावारीला शिंदे गट आणि भाजपमधील (BJP) अनेक नेत्यांनी हजेरी लावली असली तरीही शिंदे गटाचे चार आमदार आणि चार खासदार या अयोध्या दौऱ्यात गैरहजर राहिल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काल त्यांच्या विशेष विमानामध्ये भाजपचे नेते गिरीश महाजन राम कदम, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारखे अनेक नेते सहभागी झाल्याचे दिसून आले. उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे राज्यातील सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीदेखील मुख्यमंत्र्यांसमवेत राम लल्लाचे दर्शन घेतले. मात्र, या दौऱ्यामध्ये शिंदे गटाचे चार आमदार आणि चार खासदार गैरहजर असल्याचे निदर्शनास आले.
गैरहजर राहिलेल्या आमदारांमध्ये “काय झाडी आणि काय डोंगूर” या प्रतिक्रियेने प्रसिद्ध झालेले आमदार शहाजी बापू पाटील यांच्यासह शिंदे यांच्या ठाणे या बालेकिल्लातील त्यांचे सहकारी प्रताप सरनाईक, किशोर पाटील आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील शिंदे गटाचे आघाडीचे शिलेदार अब्दुल सत्तार यांचा समावेश होता.
गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये भावना गवळी आणि प्रतापराव जाधव यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील धैर्यशील माने आणि संजय महाडिक यांचादेखील समावेश होता.
या चार आमदार आणि खासदारांकडून गैरहजर राहण्याबाबत अद्याप कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आले नसल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.