@maharashtracity

मुंबई: मुंबई-पुण्यासह मोठ्या शहरांमध्ये ओला-उबेरच्या माध्यमातून प्रवाशांना ऑनलाईन बुकींगच्या माध्यमातून टॅक्सी, रिक्षा सेवा उपलब्ध करून दिली जाते. त्यात आता दुचाकी प्रवासी सेवेचीही भर पडली आहे. एकटे असणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा उपलब्ध केली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी या सेवेचा दुरूपयोग केला जात असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

पडळकरांनी व्हायरल केलेला व्हिडीओ पुण्यातील असल्याचे सांगितले जात आहे. ओला (Ola) कंपनीची बुकींग घेणाऱ्या एका दुचाकी चालकाचा हा व्हिडीओ आहे. या चालकाने मद्यप्राशन केल्याचा दावा व्हिडीओ तयार करणाऱ्या व्यक्तीने केला आहे. संबंधित चालक दारूच्या नशेत असून त्याच्या हातात दारूची बाटलीही दिसत आहे. हा चालक खिशात दारुची बाटली ठेवून प्रवाशांना नेत असल्याचा दावाही संबंधित व्यक्तीने केला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी हा व्हिडीओ ट्विट करत त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. ओला, उबेर, रेपिडो, झूम अशा ॲपचा वापर करून सर्रास अवैधरित्या दुचाकी टॅक्सी म्हणून दुरूपयोग केला जातोय. मात्र हजारोचा टॅक्स भरणाऱ्या ॲटोरिक्षा चालकांच्या पोटावर लाथ मारली जातेय, असं पडळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

परिवहन मंत्री अनिल परब व पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्याच आशिर्वादाने होत आहे का? वसूलीचे लाभार्थी कोण? मद्यधुंद सरकारपण या चालकाप्रमाणेच तोकड्या पैशांसाठी प्रवाशांचा जीव धोक्यात घालतंय, आंदोलनाशिवाय यांचा नशा उतरणार नाही का, असे प्रश्न पडळकर यांनी उपस्थित केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here