@maharashtracity

धुळे जिल्हा परिषद पोटनिवडणूक; मंगळवारी मतदान

महत्वाच्या लढतींकडे सर्वांचे लक्ष,

कुसुुंबा गटात महाविकास आघाडीत बिघाडी

धुळे: धुळे जिल्हा परिषदेच्या 15 पैकी 14 गट आणि 30 पैकी 28 गणांच्या सदस्य निवडीसाठी मंंगळवारी मतदान होत आहे. या पोटनिवडणूकीत कुसुंबा गट वगळता अन्य 13 गटांमध्ये भाजपा विरुध्द महाविकास आघाडी, अशी सरळ लढत होत आहे. (BJP contesting against MVA in Dhule ZP by-election)

राज्यात यशस्वी ठरलेल्या महाविकास आघाडीचा प्रयोग धुळे जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणूकीत यशस्वी ठरविण्यासाठी नेत्यांनी कंबर कसली आहे. तर महाविकास आघाडीला शह देण्यासाठी भाजपनेही जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीसह भाजपची कसोटी लागणार आहे.

ओबीसीच्या (OBC reservation) मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला गेला. न्यायालयाच्या निकालामुळे धुळे जिल्हा परिषदेतील ओबीसी संवर्गातील पंधरा गटातील सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पोटनिवडणूक लागली.

जिल्हा परिषद पोटनिवडणूकीच्या निमित्ताने काँग्रस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकत्रितपणे भाजपाविरोधात लढत आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या बोरकुंड गटातील उमेदवार शालिनी बाळासाहेब भदाणे या बिनविरोध निवडून आल्या. तर शिरपूर तालुक्यातील विखरण गणातून विनीता मोहन पाटील व करवंद गणातून यतीश सुनील सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली.

त्यामुळे जि.प.च्या 14 गटांच्या आणि 28 गणांच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होत आहे. सोमवारी सायंकाळी प्रचार तोफा थंडावल्या. अनेक गट, गणांमध्ये दुरंगी, तिरंगी लढती होत आहेत.

मंगळवारी सकाळी 7.30 वाजेपासून मतदानाला सुरूवात होईल. संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान सुरू राहील. यानंतर 6 ऑक्टोबरला बुधवारी मतमोजणी होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततापुर्ण वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती तयारी पुर्ण केली आहे. मतदान केंद्रांसाठी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महत्वाच्या लढती अशा

धुळे तालुक्यातील लामकानी गटात भाजपच्या धरती निखील देवरे विरुध्द शिवसेनेच्या मीराबाई परशुराम देवरे यांच्यात लढत आहे. धरती देवरे या गुजरात राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.सी.आर.पाटील यांच्या कन्या आहेत.

कापडणे गटात भाजपचे रामकृष्ण खलाणे विरुध्द राष्ट्रवादीचे किरण पाटील, मुकटी गटातून राष्ट्रवादीच्या मिनल किरण पाटील विरुध्द कल्पना पाटील, नगाव गटात भाजपचे राम भदाणे विरुध्द काँग्रेसचे सागर पाटील यांच्यात लढत आहे.

विशेष म्हणजे कुसुंबा गटातून राष्ट्रवादीच्या वैशाली किरण शिंदे विरुध्द भाजपचे संग्राम पाटील व शिवसेनेचे आधार हाके, वचित आघाडीचा अभिलाल देवरे यांच्यात लढत आहे. जि.प.च्या 14 गटापैंकी केवळ कुसुंबा गटात महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी हे वेगवेगळे लढताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here