@maharashtracity

मुंबई: आरोग्य विभागाच्या पद भरतीसाठी ऐनवेळी रद्द झालेल्या परिक्षांबाबत सोमवारी प्रदिर्घ बैठक घेण्यात आली. या बैठकीत ठरल्याप्रमाणे २४ ऑक्टोबर रोजी गट क ची परीक्षा तर गट ड साठी ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे.

या दोन्ही दिवशी रविवार असल्याने शाळा उपलब्ध होतील अशीही माहिती टोपे यांनी दिली.

दरम्यान, परीक्षेच्या तयारीसाठी डॅशबोर्ड द्यावा. तसेच परीक्षा केंद्रांची माहिती, उपलब्ध शाळांची माहिती १ ऑक्टोबरपर्यंत द्यावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. प्रक्रियेत चुकीचे काही आढळल्यास तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

परीक्षेच्या ९ दिवस आधी प्रवेश पत्रिका (हॉलतिकीट) दिले जाणार असून विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. मोठ्या स्वरुपाची परीक्षा होत असल्याच्या वावड्या उठवल्यास कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

कुणीही काहीही चुकीच्या गैर मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला तर संबंधित विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पोलीस स्टेशनला तक्रार करावी. परीक्षा पारदर्शक करण्याच्या सूचना राजेश टोपे यांनी केल्या आहेत.

मागील शनिवारी आरोग्य विभागाच्या भरती परीक्षा पुढे ढकलल्या नंतर राज्यभरातून
विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला होता.

६२०५ पदांच्या सरळ सेवा भरतीसाठी परीक्षा

दरम्यान, आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील २७३९ आणि गट ड संवर्गातील ३४६६ अशा एकूण ६२०५ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी राज्यातील १५०० केंद्रावर एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार आहे.

ही भरती प्रक्रिया शासनाने निवडलेल्या खासगी बाह्य स्त्रोतांमार्फत केली जात आहे. उत्तर पत्रिकांची तपासणी संगणक प्रणालीद्वारे केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here