@maharashtracity

रुग्णालयीन शुल्क आणि रुग्णसेवेत समस्यांच्या निवारणासाठी सेवा

मुंबई: राज्यात आम आदमी पार्टीच्या हेल्थ विंगच्या (Health wing of AAP) माध्यमातून सर्व सामान्यांसाठी ‘आप का साथी’ (Aap ka Sathi) नावाची आरोग्य हेल्पलाइन सुरु करण्यात आली.

ही हेल्पलाइन गरजू रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना आरोग्य सेवा व रुग्णालयातील उपचारांशी संबंधित बाबींमध्ये मार्गदर्शन करेल असे आपकडून सांगण्यात आले.

यातून उपलब्ध आरोग्य सेवा, तज्ञांची उपलब्धता, सरकारी योजना, विमा योजना, रुग्णांचे हक्क आणि जबाबदाऱ्या, रुग्णालयाची बिले आणि शुल्क, औषधे आणि उपकरणांची उपलब्धता यावर भर देण्यात येणार असल्याचे राज्य आरोग्य हेल्थ विंगचे संयोजक डॉ. संतोष करमरकर यांनी सांगितले.

दरम्यान, या हेल्पलाईनच्या (health online)
माध्यमातून मार्गदर्शन करणारे डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य क्षेत्रातील व्यक्ती असल्याचे सांगण्यात आले.

सध्या सुरु असलेल्या कोविड काळात रुग्णालयांनी अमाप शुल्क आकारल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. तर सरकारी रुग्णालयात काही गोष्टी उपलब्ध नसल्याने रुग्णांना मनस्ताप सोसावा लागला. काही ठिकाणी सुविधांअभावी रुग्णाचे प्राण गेल्याचे आरोप करण्यात आले.

या सर्वातून हि आप का साथी सरकारी आणि खासगी रुग्णालयावर लक्ष ठेवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या हेल्पलाईन टीममध्ये राज्यातील सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही प्रमुख रुग्णालयांमध्ये काम केलेले तज्ज्ञ असल्याचे सांगण्यात आले.

शिवाय या हेल्पलाइनसाठी वेबसाइट तयार करण्यात आली असून यात आरोग्य शंका, प्रश्न, तक्रारी किंवा चौकशी विचारल्या जाऊ शकतात.

आरोग्य हेल्पलाईन का ?

आरोग्य सेवेतील वितरण व त्यासाठीच्या पायाभूत सुविधा यात विसंगती आहे. त्याच वेळी सेवेत प्रमाणीकरण आणि निश्चितता नाही. शिवाय रुग्ण-डॉक्टर किंवा रूग्ण- रुग्णालयाच्या परस्पर संवादामध्ये अंतर्भूत अशी माहितीची विषमता आहे.

अनेकदा रुग्णालयातील माहितीच रुग्णापर्यंत पोहचत नाही. यातून रुग्णाला मनःस्ताप होतो. रुग्ण गोंधळलेल्या परिस्थितीत नेमकी माहिती न मिळाल्याने गैरसमज, शंका आणि कधीकधी वाद होऊ शकतात.

रुग्णाला अनुभवी निष्पक्ष थर्ड पार्टीच्या (तटस्थ व्यक्तीच्या) मदतीची व मार्गदर्शनाची आवश्यकता असते. त्यामुळे तटस्थ अशी हि आरोग्य हेल्पलाईन सुरु करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here