@maharashtracity

मुंबई: मुंबईत अंमली पदार्थाची सर्रास तस्करी व वापर होत असताना महाराष्ट्राचे अंमलीपदार्थ विरोधी पथक आणि गृहमंत्री झोपले आहे काय? आपली जबाबदारी ओळखून राज्यात वाढत चाललेली गुन्हेगारीची पाळेमुळे मुळासकट मोडीत काढण्याचे सोडून ठाकरे सरकार हे केवळ टक्केवारी वसुली करण्यात मग्न असल्याचा आरोप मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्व चे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

भातखळकर म्हणाले, मागील वर्षभराच्या काळात राष्ट्रीय अंमली पदार्थविरोधी पथकाकडून ४२ पेक्षा अधिक ठिकाणी छापेमारी करून राज्यातील बॉलीवूड व उद्योग विश्वात वाढत चाललेल्या ड्रग्सच्या रॅकेट चा भांडाफोड करण्यात आला. किमान त्यानंतर तरी राज्याच्या गृह विभागाकडून मुंबईसह महाराष्ट्रातील अंमली पदार्थांची पाळेमुळे शोधून काढण्याची आवश्यकता होती.

ते पुढे म्हणाले, मुंबईसारख्या शहरात इतकी देशविघातक कृत्ये होत असताना राज्याचा गृह विभाग केवळ बघ्याची भूमिका पार पाडत आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ड्रग्सचे उत्पादन व तस्करी या विरोधात जोरदार कारवाई करणे अपेक्षित असताना ते सुद्धा केवळ गृह विभाग मात्र हॉटेल व बार मालकांकडून वसुली करण्यात धन्यता मानत आहे.

इतकेच नव्हे तर कॉंग्रेसचे नेते जयराम रमेश व इतर प्रवक्ते यांनी तर थेट आर्यन खानच्या बाजूने उभे राहत जणू अंमली पदार्थ तस्करी व सेवनाला कॉंग्रेसचा पाठींबा असल्याचे दाखवून दिले आहे, असा दावा अतुल भातखळकर यांनी केला.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून मुंबईत गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. राज्याचे गृहमंत्री हे केवळ सुडाचे राजकारण करण्यात मग्न असल्यामुळे किमान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तरी मुंबईतील वाढत चाललेली अंमली पदार्थ व ड्रग्स ची खुलेआम विक्री आणि गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे असा खोचक सल्ला सुद्धा आ. भातखळकर यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here