By Anant Nalavade

Twitter : @nalavadeanant

मुंबई: मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी दिलेल्या जाहिरातीत दुरुस्ती केली. त्यात वरील भागात भाजप – शिवसेनेचा उल्लेख केला. तर मग भाजपचे मंत्री का नाहीत असा सवाल करतानाच, ज्या नऊ मंत्र्यांची माळ लावली आहे. त्यातील पाच मंत्र्यांच्या विरोधात काही ना काही माध्यमातून बातम्या सुरू आहेत. अशा वादग्रस्त मंत्र्यांच्या कारभारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न या नऊ लोकांचे फोटो छापून केला आहे का याचे उत्तरही सरकारने दिले पाहिजे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

आज लोकसभानिहाय आढावा बैठक पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवन येथे पार पडली. यावेळी विरोधी पक्षनेते पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आज पुन्हा सरकारवर निशाणा साधला. मंगळवारी आलेल्या जाहिरातीबाबत आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यायला पाहिजे होती. ‘देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ या घोषणेचे काय झाले त्याबद्दल उल्लेख करायला सरकार तयार नाही, याकडेही त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

कालच्या जाहिरातीवर शिंदे गटाच्या जबाबदार मंत्र्यांनी ती हितचिंतकांनी जाहिरात दिली असे स्पष्टीकरण दिले. परंतु तो कोण हितचिंतक आहे, पहिल्या पानावर एवढ्या महत्वाची जाहिरात दिली जाते. त्याचा मजकूर वनफोर किंवा छोटा द्यायचा झाला तर किती खर्च येतो हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे असा कोण हितचिंतक तुम्हाला मिळाला आहे, त्याचे नाव जाहीर करावे, असे स्पष्ट करतानाच पवार यांनी सरकारने जाहिरातीचे समर्थन केले नसले तरी हितचिंतक कोण आहे, कशा पद्धतीने त्याच्याकडे पैसा आला आहे हे जाहीर करावे असे आव्हानही पवार यांनी दिले.

तुमच्या सरकारबद्दल एवढा आत्मविश्वास असेल किंवा जनतेचे पाठबळ आहे असे वाटत असेल तर ज्या माध्यमातून आत्मविश्वास दाखवण्याचा प्रयत्न करत आहात तर निवडणूकीला सामोरे जा असे थेट आव्हानच पवार यांनी सरकारला दिले. तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळाले, काहींना मंत्रीपद मिळाले. परंतु इतरांना नाही. अजून २३ जागा खाली आहेत त्याच्याबद्दल शिंदे बोलत नाही. निवडणूक लावल्या तर ‘दुध का दुध आणि पानी का पानी’ होऊन जाईल असेही पवार यांनी यावेळी नमूद केले.

सरकारचे हसे करून घेण्यामध्ये कालची व आजची जाहिरात देणार्‍यांना कळले पाहिजे होते. यामागे नक्की खर्च कोण करते आहे हे देखील कळले पाहिजे अशी मागणीही पवार यांनी स्पष्ट केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here