By Anant Nalavade
Twitter : @nalavadeanant
मुंबई: महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी (मनरेगा) योजनेच्या अंतर्गत राज्य सरकारने २६ हजार २५० टॅब खरेदीसाठी काढलेल्या निविदेत घोटाळा झाल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी येथे केला. ही निविदा प्रक्रिया रद्द करून या घोटाळ्याची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी, तसेच दोषी आढळणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाकावी, अशी मागणीही दानवे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली.
रोजगार हमी योजना विभागाचे सचिव नंद कुमार हे बुधवारी सेवानिवृत्त होत आहेत. तरीही त्यांनी निविदा काढण्याचा सपाटा लावला आहे. रोजगार हमी योजना विभागाचे मंत्री संदिपान भुमरे यांच्या खात्यात ही निविदा काढण्यात आली असून २६ हजार २५० टॅब खरेदीसाठी ७० कोटी रूपयांची खरेदी निविदा काढली गेली आहे. त्या टॅबमध्ये जीआयएस मोबाईल ऍपप्लिकेशनचा समावेश असावा, अशी अट टाकण्यात आली आहे. वास्तवित केंद्र सरकारने हे मोबाईल ऍप्लिकेशन मोफत उपलब्ध करून दिलेले असताना यासाठी ३५ कोटी रूपयांचा खर्च का करण्यात आला? असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला.
१ डिसेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार ५ कोटींपेक्षा जास्त रक्कमेच्या निविदा काढण्यासाठी उच्चाधिकार समितीची परवानगी घेणे आवश्यक असताना या टॅब खरेदीसाठी परवानगी का घेतली नाही. सचिवांना १ ते ५ कोटी मर्यादेत निविदा काढण्याचे अधिकार असताना ७० कोटींची निविदा काढण्यात आली त्याचे कारण काय? असे प्रश्नही दानवे यांनी उपस्थित केले आहेत. सचिव नंदकुमार निवृत्त होणार असल्याने अवघ्या ११ दिवसांत निविदा काढली गेली, याकडेही दानवे यांनी लक्ष वेधले. सॅमसंग कंपनीलाच प्राधान्य देऊन या कंपनीलाच काम देण्यासाठी मंत्र्यांचा आग्रह असल्याचा आरोप करताना रोजगार हमी योजना विभागात अनागोंदी कारभार सुरू असून त्याची विशेष तपास पथकाच्यामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही दानवे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.