Twitter: @milindmane70

महाड

शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कायम बेताल वक्तव्य व फोटोचे विद्रूपीकरण करून त्याद्वारे उद्धव ठाकरे यांची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या भाजपा आमदार नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी महाडमधील शिवसैनिकांनी केली आहे. यावेळी शिवसैनिकांनी राणे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करीत त्यांचा निषेध केला.

केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग मंत्री नारायण तातू राणे यांचे पुत्र व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा आमदार नितेश राणे हे मागील काही दिवसापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करून त्यांच्या फोटोचे विद्रूपीकरण करण्याचे काम सोशल मीडियाद्वारे करून त्यांची बदनामी करीत आहेत. याच्या निषेधार्थ महाडमधील उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात नितेश राणे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करीत त्यांचा निषेध केला.

आमदार राणे हे राजकीय संस्कृती बिघडवण्याचे काम करीत असून शिवसैनिकांना भडकवून राज्यात अशांतता कशी माजेल हा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप  शिवसैनिकांनी केला आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना शहर प्रमुख चेतन पोटफोडे यांनी शहर पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे.

वाहतूक सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुभाष मोरे, महाड शहर संपर्कप्रमुख विजय तांबट, मंगेश देवरुखकर, मोहन बेल, उपशहर प्रमुख प्रफुल धोंडगे, युवा सेना तालुका अधिकारी दिलीप दांडेकर, राज देशमुख, ममता शिंदे, अविनाश चौधरी, साहिल हेलेकर, उमेश जगताप, अमित गोगावले, नाना पितळे, नथुराम दिवेकर, आशिष नगरकर व महेंद्र जोगळे आदी शिवसैनिक या निषेध आंदोलनात  सहभागी झाले होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here