Twitter: @maharashtracity

मुंबई: गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी निश्चित कालमर्यादेतला कार्यक्रम आखला जाईल, या संदर्भातील बैठक लवकरच घेऊ असे उत्तर मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात दिले. ठाणे जिल्ह्यात यासाठी शासनाने जाहीर केलेल्या ४३.४५ हेक्टर पैकी २१.८८ हेक्टर जमीन सुयोग्य असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाला अशी माहितीही त्यांनी दिली.

भाजप सदस्य सुनील राणे यांनी ही लक्षवेधी मांडली होती. म्हाडा विभाग, कामगार आयुक्तालय आणि मनपांमध्ये समन्वय निर्माण करून, विशिष्ट कालावधीत कार्यान्वित करावी आणि गिरणी कामगारांना दिलासा द्यावा, अशी मागणी राणे यांनी केली. काँग्रेस सदस्य बाळासाहेब थोरात यांनी यावेळी कानाकोपऱ्यातून कामाच्या निमित्ताने मुंबईत आलेले गिरणी कामगार हे मुंबईचे खरे निर्माते आहे, त्यांच्या हक्काच्या घराचा प्रश्न सुटावा यासाठी शासनाने कालमर्यादा निश्चित करावी आणि सकारात्मकरित्या हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली.

थोरात म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाच्या काळात हा प्रश्न प्रामुख्याने समोर आला. महसूल मंत्री या नात्याने हा प्रश्न हाताळायची जबाबदारी आपल्याकडे होती. आम्ही या प्रश्नात खूप काम केले, पुढे गेलो आणि अनेक प्रश्न मार्गी लावले. गिरणी कामगारांच्या प्रश्नाकडे केवळ राजकारण म्हणून बघू नये, असे आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here