@maharashtracity

मुंबई: होलार समाजाचा स्वतंत्र अभ्यास करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. तसेच होलार समाजाने केलेल्या विविध मागण्यांबाबत धोरणात्मक निर्णय तातडीने घेवून या समाजाचे प्रश्न सोडविण्यात येतील, अशी ग्वाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

राज्यातील होलार समाजाच्या विविध प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक पार पडली.
मुंडे म्हणाले, सामाजिक न्याय विभागातंर्गत उच्चस्तरीय समिती नेमून होलार समाजाच्या जातीच्या वर्गवारी संदर्भात सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल.

होलार समाजासंदर्भात बार्टीने नव्याने या जातींचा अभ्यास करावा. जातीच्या नोंदी जेंव्हा नव्याने केल्या जातील तेंव्हा त्या अगदी काटेकोरपणे करण्यावर भर द्यावा. स्टँड अप योजना तसेच सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून या समाजातील जास्तीत जास्त उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी नव्याने धोरण करत असून ते लवकरच जाहीर करणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.

मुंडे म्हणाले, दादासाहेब सबलीकरण योजना राबविताना ज्या लाभार्थ्यांसाठी ही योजना आहे त्यांना समन्यायी वाटप करावे. याबाबत सामाजिक न्याय विभागाने सर्व जिल्हाधिकारी व समाजकल्याण विभागाचे सहआयुक्त यांना पत्राव्दारे कळवावे. सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणा-या योजनांमध्ये सर्वांना समन्याय देण्यात यावा, अशा सूचना मुंडे यांनी केल्या.

होलार समाजाचे प्रतिनिधी राजाराम देवळे यांनी यावेळी समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी अनेक सुचना मांडल्या. या समाजाच्या अभ्यासासाठी स्वतंत्र आयोग नेमावा, अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये अ,-ब, क, ड वर्गवारी करून समाजाला ठराविक आरक्षण मिळावे, समाजाची स्थानिक चौकशी करून त्या आधारावर जात पडताळणी मिळावी, समाजातील वाजंत्री कलाकांरासाठी अनुदानाची शिफारस, मागासवर्गीय विद्यार्थ्यी वसतीगृहात समाजातील विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्यात यावा, समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणे, राज्यस्तरावरील समितीमध्ये या समाजाचा प्रतिनिधी नेमणे, या समाजात उद्योजक तयार व्हावेत यासाठी शासनाकडून नव्याने योजना देण्यात याव्यात अशा विविध सुचना या बैठकीत समाजाच्या प्रतिनिधींनी मांडल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here