शिवसेना-भाजप युतीची शक्यता मावळली

@vivekbhavsar

मुंबई: कोकणातील भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद दिल्याने महाराष्ट्रात शिवसेनेची डोकेदुखी वाढणार आहे. दरम्यान, भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन आणि त्यापाठोपाठ राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश या दोन घटनांचे बिंदू जोडल्यास येणाऱ्या नजीकच्या भविष्यात भाजप आणि सेना अशा युतीचे सरकार सत्तेत येईल ही शक्यता पूर्णपणे मावळली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावसाळी अधिवेशन समाप्तीनंतर पत्रकारांशी बोलतांना भाजप-सेना युतीची शक्यता नाकारली होती. मात्र, ही बाब सोमवारी पीठासीन अधिकारी आणि शिवसेनेचे कोकणातील गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केले तेव्हाच स्पष्ट झाली होती. त्यात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांचे कोकणातील काही जिह्यात सीमित झालेले नेतृत्व केवळ शिवसेनेला शह देण्यासाठी मोठे केले असावे, अशी सेनेत चर्चा आहे.

महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षण या दोन मुद्द्यांवर वातावरण तापले आहे. राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून आरक्षणाच्या समस्येतून स्वतःची सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात आहे. अशा वेळी मराठा राणे यांच्याकडे मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी केंद्रकडून दिली जाऊ शकते.

नारायण राणे यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. पृथ्वीराज चव्हाण सरकारच्या काळात राणे यांनी राज्यात ठिकठिकाणी दौरे करून मराठा आणि ओबीसी समाजाचे म्हणणे ऐकून घेऊन मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली होती. पुढे ती न्यायालयात टिकली नाही आणि अजूनही मराठा समाजाचा लढा सुरू आहे.

यदाकदाचित राणे यांच्याकडे मंत्रीपदासोबतच मराठा समाजाची जबाबदारी सोपविण्यात आली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना किंवा त्यांच्या सरकारमधील संबंधित नेत्यांना नारायण राणे यांच्याकडे वारंवार जावे लागेल अशी शक्यता आहे.

ज्या राणेंना सेनेत प्रचंड विरोध असतो, त्याच राणेंनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरेंना जावे लागेल, हा नियतीने उगवलेला सूड असेल.

दुसरी बाब म्हणजे मंत्री झाल्यावर राणेंच्या अजेंड्यावर कोकणात भाजपचे राजकीय वर्चस्व वाढवणे आणि सेनेचे खच्चीकरण करणे या दोन बाबी असतील. खासदार विनायक राऊत, माजी मंत्री दीपक केसरकर आणि आता भास्कर जाधव हे राणे यांच्या रडावरवर असू शकतील. केसरकर यांनी राणे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव केला होता, त्यामुळे केसरकर यांचा पहिला नंबर असू शकेल.

कोकणातील ज्या खासदाराला मंत्रिपद मिळाले त्याच्याकडे अवजड उद्योग हेच मंत्रालय सोपवले गेले आहे. राणे यांच्याकडे हेच खाते दिले गेले तर राज्यातील उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासाठी राणे डोकेदुखी ठरू शकेल. तसेच सेनेने भंगारात टाकलेला नाणार येथील पेट्रोकेमिकल प्रकल्प पुनरुज्जीवित व्हावा यासाठी राणे त्यांचे वजन खर्ची टाकू शकतील. यातुन पुन्हा सेना विरुद्ध भाजप संघर्ष पेटू शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here