पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंदीर निर्माणाचे स्वप्न साकार होत असल्याचा आनंद आणि समाधान

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत नेतृत्वाखाली महसूल मंत्र्यांनी घेतले प्रभू श्रीरामांचे दर्शन आणि केली महाआरती

Twitter: @maharashtracity

अयोध्या: रामल्लाचे दर्शन आणि ऐतिहासिक अशा राम मंदीराच्या उभारणीचे काम पाहून कृतकृत्य झालो असल्याची प्रतिक्रिया महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अयोध्येतून व्यक्त केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आयोध्येत जावून प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले आणि महाआरतीत देखील सहभाग घेतला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निमंत्रणानंतर विखे पाटील काल अयोध्येकडे रवाना झाले होते. आज त्यांनी अयोध्येत राम मंदिराच्या सुरू असलेल्या कामाची पाहाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत केली. मंदिर निर्माणातील कारागीर, स्थानिक नागरीक तसेच सुरक्षा रक्षकांशी मंत्री विखे पाटील यांनी संवाद साधून या सर्व कामातील बारकावे जाणून घेतले.

या सर्व पाहाणीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, अयोध्येत सर्वाच्या सोबतीने झालेले प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन आणि अनेक वर्षाची प्रतिक्षा असलेले राम मंदिर उभे राहात असल्याची पाहणी करता आली, यामुळे आपण कृतकृत्य झालो असल्याचे त्यांनी सांगितले.

अयोध्येत राम मंदिर व्हावे ही कोट्यावधी रामभक्तांची इच्छा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंदीर निर्माणाचे स्वप्न साकार होत असल्याचा आनंद आणि समाधान असल्याचे सांगून मंत्री विखे म्हणाले की, मंदीराचे काम अतिशय आखीव रेखीव पध्दतीने होत आहे. प्रत्येक खांबावरील नक्षीकाम अतिशय सुबक आणि लक्ष वेधून घेणारे असल्याने प्रभू श्रीरामाचे मंदीर हे भारतीय संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here