@maharashtracity

मुंबई: केंद्र सरकारने तिसऱ्या लाटेबाबत केलेल्या अंदाजानुसार रूग्णसंख्या असल्यास राज्यात ऑक्सिजनची गरज वाढू शकते. अशावेळी ७०० मेट्रिक टनपेक्षा अधिक ऑक्सिजन वापरला गेल्यास निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागेल, असा पर्वणीचा इशारा सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. तोंडावर आलेला गणेशोत्सव आणि केरळ मधील ओणम उत्सवात गर्दीमुळे झालेली रूग्ण वाढ यावर टोपे बोलत होते.

गणेशोत्सव हा राज्यात उत्साहाने साजरा करण्यात येणारा सण आहे. दहा दिवस सर्वच गणेशभक्त आनंदाने हा उत्सव साजरा करतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड वर्तणुकीचे पालन न झाल्यास गर्दीमुळे संसर्ग पसरू शकतो.

गणेशोत्सवात गर्दी टाळण्याच्या सूचना केंद्रा ने दिली आहे. हा इशारा सार्वजनिक गणेश भक्तांनी पाळवा. तसेच गणेशोत्सव मंडळांनी कोरोनाविषयक नियम पाळून सण साजरा करावा, असेही टोपे म्हणाले.

तिसऱ्या लाटेच्या तयारीबाबत सांगताना ते म्हणाले की, ऑक्सिजन निर्मितीत चांगली वाढ केली असून मागील वेळी एक हजार ३०० मेट्रिक टनपर्यंत ऑक्सिजन उत्पादन करत होतो. आता १४०० ते १५०० मेट्रिक टनपर्यंत वाढ झाली आहे. तसेच राज्यात ४५० पीएसए प्लँट सुरु करत आहोत. त्यापैकी २५० प्लँट कार्यान्वित झाले आहेत.

सगळ्या परिस्थितीचा विचार केल्यास महाराष्ट्रात दोन हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादित होऊ शकतो. मात्र, केंद्र सरकारने तिसऱ्या लाटेबाबत अंदाज व्यक्त करत असताना रुग्ण संख्येचा जो आकडा वर्तविला आहे तो जर प्रत्यक्षात खरा ठरला तर ऑक्सिजनची गरज वाढू शकते.

राज्यात ७०० मेट्रिक टनपेक्षा जास्त ऑक्सिजन वापरला गेल्यास निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागेल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here