@maharashtracity

शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्‍वासन

धुळे: धुळे तालुक्यातील शिरूड-बोरकुंड बोरी परिसरासह धुळे तालुक्यात पावसात झालेल्या वित्त व जीवीत नुकसानीचा तातडीने पंचनामा करून शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. पावसामुळे झालेल्या नुकसानीचा शेतकर्‍यांना पुरेपूर मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही आमदार पाटील यांनी सांगितले आहे.

धुळे तालुक्यात मुसळधार पावसासह सततधार पाऊस सुरु आहे. ठिकठिकाणी सरासरीपेक्षाही जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे धुळे तालुक्यात शेतीसह घरांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने दखल घेऊन आमदार कुणाल पाटील यांनी महसूल विभागाशी संपर्क साधला आणि झालेल्या नुकसानीचा विनाविलंब पंचनामा करण्याच्या सूचनाही दिल्या.

धुळे तालुक्यात बोरी परीसरात रविवारी तीन तासात १०४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे बोरी व कानोली नदीला पूर आला असून अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी शिरले आहे. बोरी परीसरात शिरुड, बोरकुंड, मोरदड, विंचूर, चांदे, खोरदड, नाणे, सिताने, दोंदवाड, मांडळ, रतनपुरा, तरवाडे, जुनवणे, निमगुळ, धामणगाव, बोधगाव या परिसरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी घरांची पडझड झालेली आहे.

तसेच शेतांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचेही नुकसान झाले आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचा महसूल व कृषी विभागाने संयुक्तरित्या तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना आमदार कुणाल पाटील यांच्या सुचनेनंतर धुळे तालुक्यात पंचनामे करण्याची कामे सुरू झाली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here