@maharashtracity

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सरकारमध्ये बसून हेरगिरी करणा-यांना चपराक

राज्यातही पेगॅसस वापरून पत्रकार, विरोधक, विचारवंतांवर पाळत ठेवणा-या सुत्रधारांची नावे समोर येतील

मुंबई: पेगॅसस स्पायवेअर (Pegasus spyware) प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेला निकाल अत्यंत महत्वपूर्ण असून या निर्णयाचे महाराष्ट्र काँग्रेस पक्षाने स्वागत केले आहे.

लोकांच्या खाजगी आयुष्यात हेरगिरी करणे हा घटनेने दिलेल्या व्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला आहे. केंद्रातील भाजपा सरकारने (BJP government) हे काम केले आहे का नाही, याची चौकशी झाली पाहिजे ही काँग्रेस पक्षाची (Congress) मागणी होती. ती न्यायालयाने उचलून धरली असून आता यामागचे खरे सुत्रधार जनतेसमोर आले पाहिजेत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. (MPCC President Nana Patole)

यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने पेगॅसस हेरगिरी प्रकरणी चौकशी लावलेली आहे. या चौकशीतून पेगॅसस वापरून लोकांवर पाळत ठेवणाऱ्या आणि व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या मोदी – शहांनी चालवलेला सत्तेचा गैरवापर बाहेर येईल.

ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारने या प्रकरणातही टोलवाटोलवी करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय सुरक्षेचा बाऊ करत माहिती देण्यास टाळाटाळ केली. परंतु, केंद्र सरकारच्या कोणत्याच नौटंकीला न जुमानता सुप्रीम कोर्टाने तज्ञांची चौकशी समिती नेमली.

“राष्ट्रीय सुरक्षेचे कारण पुढे करुन केंद्र सरकारला सामान्य नागरिकांच्या मुलभूत हक्कावर गदा आणता येणार नाही हेच न्यायालयाने बजावले आहे. आमचे नेते खा. राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित करुन सरकारला जाब विचारला होता”, अशी आठवण नाना पटोले यांनी करून दिली.

ते म्हणाले की, सर्व विरोधी पक्षही राहुलजींच्या नेतृत्वाखाली या अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर एकत्र आले होते. पण हुकूमशाही पद्धतीने राज्यकारभार करणाऱ्या मोदींनी त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले. मात्र, न्यायालयाने या हुकूमशाहीवृत्तीला जुमानले नाही. न्यायालयाने चौकशी समिती नेमणे ही मोदी सरकारला मोठी चपराकच आहे.

पटोले म्हणाले, महाराष्ट्रातही फडणवीस सरकारच्या काळात माझ्यासह अनेक विरोधकांचे फोन टॅप करण्यात आले होते. माझा फोन नंबर व अमजद खान असे नाव ठेवून थेट अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंध जोडून फोन टॅप करण्यात आला होता. हा प्रश्न मी विधानसभेतही उपस्थित केला होता.

Also Read: आशा स्वयंसेविकाना दिवाळीपूर्वी थकबाकी देण्याचे आश्वासन

राज्यातील विचारवंतांच्या लॅपटॉपमध्ये मालवेअर टाकून त्यांना तुरुंगात टाकणे, पेगॅससचा वापर करुन पत्रकार, विरोधक, विचारवंतांवर तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने पाळत ठेवण्याचे काम केले. न्यायालयाच्या आजच्या निकालानंतर राज्यातील हेरगिरी प्रकरणातील सुत्रधारही बाहेर येतील, अशी आशा नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here