@maharashtracity

मुंबई: पदोन्नतीतील आरक्षणाला (reservation in promotion) स्थगिती देणारा 7 मे रोजी काढलेल्या जीआरच्या (GR) विषयावर आज मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा पार पडली असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत (Dr Nitin Raut) यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

पदोन्नतीतील आरक्षण या विषयावर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची (cabinet subcommittee) बैठक आज या उपसमितीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

“आजच्या बैठकीत या विषयावर सखोल चर्चा झाली. या विषयावर निर्णय घेण्याबद्दल एकमत झाले. या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याची पुढील सुनावणी 21 जून रोजी आहे. त्यामुळे थांबायचे की पुढे जायचा हा पेच आहे. मात्र उपसमिती या विषयावर सकारात्मक आहे,” असे डॉ. राऊत यांनी सांगितले.

“या संदर्भात कायदेशीर अभ्यास करायचे आम्ही ठरवले आहे. कायदेशीर बाबी अनेक आहेत, तशाच इतरही अनेक बाबी आहेत आणि सकारात्मक निर्णय होईल. तीन पक्षाचे सरकार आहे. आता फक्त निर्णयाप्रत पोहोचायचं आहे. अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि तो निर्णय सकारात्मक असेल”, असं ते म्हणाले.

मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे या आरक्षणावर भर देऊन ते कसं कार्यान्वित करता येईल या विषयी आज चर्चा झाली. लवकरच यावर सकारात्मक तोडगा निघेल असा विश्वास डॉ राऊत यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here