@maharashtracity

मुंबई: पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) हद्दीतील गुंठेवारीची प्रकरणे नियमित करण्याबाबत नगरविकास विभागाने (Urban Development Department – UDD) निर्गमित केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (UD Minister Eknath Shinde) यांनी दिले.

पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील विविध विकासकामांचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या दोन्ही शहरांच्या मनपा आयुक्तांना याबाबत निर्देश दिले. सर्व कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश शिंदे यांनी या दोन्ही मनपा आयुक्तांना दिले.

दिनांक ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची गुंठेवारी नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. या नियमांची अंमलबजावणी अजूनही सूरु झाली नसल्याचे निदर्शनास आल्याने, याबाबत शासनाने सर्व मनपा आयुक्तांना पत्र पाठवून या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रस्ताव स्वीकारण्यास सांगितले होते.

त्यानुसार आलेल्या प्रस्तावावर नियमांच्या अधीन राहून कार्यवाही करावी, तसेच कोणत्याही गुंठेवारीधारकास गुंठेवारी नियमित करण्याची इच्छा असल्यास त्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

पुणे महानगरपालिकेची हद्दवाढ झालेली आहे. यानंतर पुणे महानगरपालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने परवानगी दिली असून भरतीसाठी पदांच्या आकृतिबंधाला देखील मंजुरी देण्यात आलेली आहे. ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री शिंदे यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांना दिले.

पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेतील नागरिकांना २४ तास पाणी पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अमृत योजना अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याचे समजले. शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये यासाठी या योजनेच्या कामाला गती देण्याचे निर्देश त्यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांना दिले.

तसेच ही योजना पूर्ण होईपर्यंत देखील शहरातील नागरिकांना एक दिवसाआड सुरु असलेला पाणी पुरवठा नियमित करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यसभा खासदार संजय राऊत, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी आणि महेश पाठक यांचेसह पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील, शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख संजय मोरे आणि पिंपरी चिंचवड शहरप्रमुख ऍड. सचिन भोसले हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here