@maharashtra.city

मुंबई महापालिकेच्या (BMC) संभाव्य सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३६ प्रभागांच्या रचना प्रकाशित करण्यात आल्या आहे. मात्र, यामध्ये पूर्वीच्या ९ प्रभागांमध्ये वाढ करतानाच ज्या ठिकाणी भाजपचे प्राबल्य आहे, अशा प्रभागांच्या सिमांच्या कक्षा रुंदावत जाणीवपूर्वक त्यांना अस्थिर करण्याचे काम केल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे भाजपच्या प्रत्येक नगरसेवकांमधून या वाढीव तसेच घटलेल्या प्रभागांमधील सिमारेषांमुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे काही प्रभागांमध्ये आवश्यकता नसतानही सिमा रेषा हलवून एकप्रकारे भाजपच्या नगरसेवकांना अस्थिर करण्याचा प्रयत्न करण्यात तर आला नाही ना असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

या प्रभागांमध्ये ९ नवीन प्रभागांची वाढ

मुंबई महापालिकेच्या २२७ ऐवजी वाढीव २३६ प्रभागांच्या रचनेचा आराखडा सादर केला असून या प्रभागांची यादी महापालिकेने १ फेब्रुवारी रोजी आपल्या संकेतस्थळावरून प्रदर्शित केली आहे. त्यानुसार लोकप्रतिनिधींना तसेच राजकीय पक्षांना १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागवण्यात येत आहेत. मंगळवारी प्रदर्शित झालेल्या २३६ प्रभागांच्या रचनेनुसार जे ९ प्रभाग वाढले आहे, ते शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे यामध्ये प्रत्येकी तीन याप्रमाणे वाढले आहेत.

शहरामधील वरळी (जी दक्षिण), वडाळा ,परळ, शिवडी (एफ दक्षिण) आणि भायखळा माझगाव (ई), तर पूर्व उपनगरांमध्ये चेंबूर (एम पश्चिम), कुर्ला (एल) आणि घाटकोपर (एन) तसेच पश्चिम उपनगरांमध्ये बोरीवली व दहिसरमधोमध (आर उत्तर व आर मध्य), कांदिवली (आर दक्षिण) व वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व (एच पूर्व) या प्रभागांमध्ये ९ नवीन प्रभागांची वाढ झाली आहे.

प्रभागांच्या रचनेमध्ये सीमाच ओलांडल्या?

मंगळवारी प्रदर्शित झालेल्या प्रभाग रचनेच्या यादीमध्ये अगदी पूर्व उपनगराच्या शेवटाला वसलेल्या मुलुंड टी वॉर्डमधील सर्व प्रभागांची हलवाहलवी करण्यात आली आहे. या प्रभागांमध्ये भाजपचे प्राबल्य असून कोणत्याही प्रकारे प्रभागांची रचना बिघडवली तरी भाजपचाच उमेदवार निवडून येईल, अशाप्रकारचा पक्का बेस तयार असतानाही पूर्व विभागात पूर्णपणे असलेल्या प्रभागात पश्चिममेकडील काही वस्त्यांचा समावेश करण्यात आला.

भाजपचे (BJP) मुलुंडमधील नगरसेवक आणि महापालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे (Prabhakar Shinde) यांनी प्रभागांच्या रचनेमध्ये सीमाच ओलांडल्या गेल्याचे म्हटले आहे. प्रभाग क्रमांक १०६ जो पूर्णपणे पूर्व विभागातच आहे त्याला पश्चिमेकडील भाग जोडण्यात आला आहे. नियमानुसार रेल्वे रुळ, पूल, नाला या ओलांडून प्रभागांच्या सीमा रेषा नसाव्यात. मग मुलुंडमध्ये असे का केले हे अनाकलनीयच असल्याचे प्रभाकर शिंदे यांनी म्हटले आहे.

जाणीवपूर्वक नगरसेवकांना अस्थिर करण्याचे काम

मुलुंडमधील प्रत्येक प्रभागांमध्ये ही परिस्थिती आहे. त्यामुळे भाजपच्या सर्व नगरसेवकांना आता प्रभागांच्या सिमांचा अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या असून अशाप्रकारे जर सिमा ओलांडल्या गेल्या असतील तर त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही सुरु केला आहे. परंतु ज्या ज्या भागांमध्ये भाजपचे प्राबल्य आहे, तेथील सिमा जाणीवपूर्वक बदलून जाणीवपूर्वक नगरसेवकांना अस्थिर करण्याचे काम तर गेले नाही अशी आमच्या मनात शंका येते, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here