@maharashtracity

विश्वनाथ नेरुरकर यांनी केला गौप्यस्फोट

बाळासाहेबांनी मैत्रीधर्म निभावला

मुंबई: कर्नाटकात येडियुरप्पांसह भारतीय जनता पक्षाचे 37 आमदार शिवसेनेत येणार होते. पण, भारतीय जनता पक्ष (BJP) हा शिवसेनेचा (Shiv Sena) मित्रपक्ष आहे, कशाला मित्रपक्ष फोडता? असा सवाल करुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी कर्नाटकात (Karnataka) भारतीय जनता पक्षाची सत्ता वाचविली, असा दावा शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर यांनी केला.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘भगवा सप्ताह’ या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून बोरीवली पूर्व येथील गावकर सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भाजप नेतृत्वाला कानपिचक्या देतांना विश्वनाथ नेरुरकर म्हणाले, राधाकृष्ण विखे पाटील (Radha Krishna Vikhe-Patil) यांचे सख्खे भाऊ शिवसेनेत येणार होते, पण कशाला दुसऱ्याचे घर फोडायचे ? असे सांगत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विखे पाटील यांचे घर तुटण्यापासून वाचविले.

प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thackeray) यांच्या मुशीतून तयार झालेले नेतृत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे. मित्रपक्ष किंवा कुणाचे घर फोडणारी आमची अवलाद नाही, अशा सणसणीत शब्दांत नेरुरकर यांनी भाजपला सुनावले.

नेरुरकर यांनी भाजपच्या भूमिकेची आणि विश्वासघातकी कारवायांची लक्तरे काढली. “मी कर्नाटकात संपर्क प्रमुख होतो. तिथे संघटना वाढविण्यासाठी आम्ही परीश्रम घेतले. प्रमोद मुतालिक आणि सहकारी यांच्यासमवेत बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर या कर्नाटकव्याप्त मराठी बहुल भागात संघटना बांधली.”

“त्यावेळी बी. एस. येडियुरप्पा यांच्यासह सदतीस आमदार शिवसेनेमध्ये येण्याच्या तयारीत होते. मी मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांना ही बाब सांगितली. तेंव्हा शिवसेनेची भाजपसोबत युती असल्याने बाळासाहेब ठाकरे यांनी नको, मित्रपक्ष कशाला फोडायचा ?” असे मला स्पष्टपणे सांगितल्याची आठवण नेरुरकर यांनी सांगितली.

“शिवसेना कर्नाटकात भक्कमपणे काम करीत होती. त्यामुळे एकवेळ भाजपच्या हातून सत्ता जाऊ पहात होती. बाळासाहेबांनी भाजपची सत्ता अबाधित ठेवली. असेच एकदा विजय मोरे या बेळगावच्या महापौरांना ‘कन्नड रक्षण वेदिके’ या संघटनेच्या लोकांनी काळे फासले. तेव्हा महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोक मातोश्रीवर आले. त्यांनी तक्रार केली. बाळासाहेब ठाकरे यांनी ठणकावून सांगितले की जर कर्नाटकात मराठी माणसाच्या केसाला जरी धक्का लागला तर मुंबई महाराष्ट्रातील कानडी माणसाला त्याचे परिणाम भोगावे लागतील,” असा इशारा बाळासाहेब यांनी दिल्याची आठवण सांगून नेरुरकर म्हणाले, मराठी माणसाबद्दलचे बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेम यातून दिसून येते.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील झुंझार नेते प्रबोधनकार ठाकरे यांच्या मुशीतून तयार झालेल्या बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाच हे करु शकते, असे विश्वनाथ नेरुरकर यांनी ठणकावून सांगितले.

१९३७ साली प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या ‘प्रबोधन’ या वर्तमानपत्रात जी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसंबंधी भूमिका मांडली होती, तीच सर्वांना एकत्र आणण्याची शिवसेनेची भूमिका बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पुढे कायम ठेवल्याचेही विश्वनाथ नेरुरकर यांनी आवर्जून सांगितले.

विजय वैद्य यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या आठवणी सांगितल्या तर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी ‘आठवणीतले प्रबोधनकार’ या पुस्तकाचा प्रवास उलगडून सांगितला. याच कार्यक्रमात राष्ट्रपती पदक विजेते पोलिस अधिकारी जगदाळे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल आव्हाड यांचा आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर बाल जादूगार स्वानंद रणदिवे याचाही सत्कार करण्यात आला.

ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य लिखित ‘आठवणीतले प्रबोधनकार’ या पुस्तकाचे ज्येष्ठ नागरिकांना वितरित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here