By संतोष मासोळे

@SantoshMasole

धुळे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खाजगीत भेट घेतल्याची आणि त्यानंतर शिवसेना- भाजप पुन्हा एकत्र येणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र या केवळ वावड्या असून भविष्यात कोणासोबत मैत्री करायची याचा निर्णय वाघ (शिवसेना) घेईल, आणि वाघाने (भाजपला) लोळवले आहे अशा शब्दात शिवसेना नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी या शक्यतांना उत्तर दिले आहे.

शिवसेना (Shiv Sena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज धुळ्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक आढावा बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर परखडपणे भाष्य केले.

सायबर फौजांच्या माध्यमातून सत्ता मिळविणाऱ्यांना तोडीसतोड उत्तर देण्यासाठीच विरोधी पक्षांनीही तशाच फौजा निर्माण केल्या.या माध्यमातून लगेच प्रतिउत्तर मिळत असल्याने समाज माध्यमांवरही निर्बंध घातले जाताहेत.असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी भाजपाचा समाचार घेतला. शिवसेना आजही प्रखर हिंदुत्ववादी असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

प्रत्येक पक्षाची विचारसरणी वेगवेगळी असून अंतर्गत धुसफूस असली, तरी महाविकास आघाडी (MVA) सरकार संपूर्ण पाच वर्ष पूर्ण सत्तेवर राहील, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षाच्या नेत्यांशी मैत्री पूर्ण संबंध असणे यात काहीच गैर नाही. असे सबंध कायमच जपले गेले आहेत असही ते म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांच्या स्वतंत्र लढण्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देतांना राऊत म्हणाले की, स्थानिक पातळीवर प्रत्येक पक्ष स्वबळावर लढण्यासाठी स्वतंत्र आहेच. पण लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महाआघाडी एकत्र राहील. कॉग्रेस स्वबळावर लढणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनाही एकत्र येऊन लढतील असा विचार शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी मांडला आहे असे राऊत म्हणाले.

ते म्हणाले कोरोनाच्या काळात लोकांना भेटता आले नाही. संघटनेत शिथीलताही यायला नको म्हणुन दौरा करत आहोत. दरम्यान मुख्यमंत्रीही नुकतेच दिल्ली येथे जाऊन आले. या पार्श्वभूमीवर माध्यमांनी मुळ प्रश्न बाजुला ठेवून भलतेच मुद्दे पुढे आणले.

भाजप संदर्भातील एका प्रश्नावर राऊत म्हणाले, वाघ ठरवेल भविष्यात कोणाशी मैत्री करायची. वाघाने खेळवले आणि लोळवले आहे याची आठवण राऊत यांनी त्यांच्या शैलीत करून दिली. नवी मुंबई (Navi Mumbai) विमानतळाला बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव द्यावे म्हणून केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शिवसेना आजही प्रखर हिंदुत्ववादी आहे. याचे स्मरण राऊत यांनी करून दिले.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे गोड, निरागस लहान मुलासारखे असल्याचे म्हणत भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना संजय राऊत यांनी उपरोधिक टोला लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here