@maharashtracity

रस्त्यावर उतरण्याचा इशारा

धुळे: धुळे शहरातील देवपूरमधील एसएसव्हीपीएस महाविद्यालय ते मराठा बोर्डिंगपर्यंतच्या रस्त्यावर तब्बल दीड वर्षापासून मोठा खड्डा खोदून ठेवलेला आहे. मुजोर महापालिका प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि मनपाच्या पदाधिकार्‍यांकडून या भल्यामोठ्या खड्ड्याकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ शनिवारी शिवसेनेने त्या खड्ड्याचा वाढदिवस साजरा करुन प्रतीकात्मक आंदोलन केले. (Shiv Sena stages protest against pothole)

या आंदोलनात सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, जिल्हाप्रमुख डॉ.तुळशीराम गावित, महानगर प्रमुख सतीश महाले, मनोज मोरे, महिला संघटक संगीता जोशी, महानगर उपप्रमुख ललीत माळी, देविदास लोणारी, चंद्रकांत गुरव आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या संदर्भात शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देवपूरमधील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai – Agra Highway) एसएसव्हीपीएस महाविद्यालय ते मराठा बोर्डिंगपर्यंतच्या एका बाजूच्या रस्त्यावर भूमिगत गटार योजनेसाठी दीड वर्षापूर्वी खड्डा खोदण्यात आला.

अद्यापही तो खड्डा बुजवून रस्त्याचे काम करण्यात आलेले नाही. यामुळे सुमारे 60 ते 70 हजार देवपूरवासीयांना वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागत आहे. एवढेच नव्हे, तर अनेकदा अपघातही झाले आहेत.

मात्र, जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP), महापालिका प्रशासन (DMC) व पदाधिकारी या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे शिवसेनेने या खड्ड्याचा वाढदिवस साजरा करुन प्रतिकात्मक आंदोलन केले.

मात्र, तरीही कुठलेही सोयरसुतक न पाळता महापालिका प्रशासन या कामात तांत्रिक अडचणी दाखवून बेकायदेशिररीत्या ठेकेदाराशी संगनमत करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, धुळे महापालिकेच्या दोषी अधिकारी व ठेकेदाराची तत्काळ चौकशी करावी, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

तसेच नवरात्रीच्या पहिल्या माळेपर्यंत शहरातील सर्व खड्डे न बुजविल्यास शिवसैनिक रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील, असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here